सराईत दुचाकी चोरट्याला बेड्या; वाकड पोलिसांनी हस्तगत केल्या १३ दुचाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:32 PM2021-09-04T19:32:24+5:302021-09-04T19:32:51+5:30
यापूर्वी वाकड, स्वारगेट, खडक, विमानतळ, भोसरी, चिखली, पिंपरी, वडगाव परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न
पिंपरी : शहरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यालाअटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन लाख ८० हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या. वाकड पोलिसांनी ही कामगिरी केली.
शुभम बजरंग काळे (२२, रा. बोबडेवाडी, ता. केज, जि. बीड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील वंदू गिरे आणि राजेंद्र काळे यांना आरोपी शुभम हा एका दुचाकीचे हँडल लॉक तोडत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता दुचाकी चोरत असल्याची त्याने कबुली दिली.
त्याने यापूर्वी वाकड, स्वारगेट, खडक, विमानतळ, भोसरी, चिखली, पिंपरी, वडगाव परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीने चोरी केलेल्या दुचाकी त्याच्या मूळगावी कागदपत्र आणून देण्याच्या बोलीवर विकल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी केज, बीड येथून चोरीच्या १३ दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईमुळे दहा गुन्हे उघडकीस आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, कर्मचारी विभीषण कन्हेरकर, बापू धुमाळ, नितीन ढोरजे, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, अतिश जाधव, नितीन गेंगजे, प्रशांत गिलबिले, शाम बाबा, कल्पेश पाटील, तात्या शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.