घटस्फोट खटल्याची हॅप्पी एंडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 03:10 AM2018-10-29T03:10:25+5:302018-10-29T06:48:37+5:30
खटला अंतिम टप्प्यात असताना पुन्हा जुळला सूर
पुणे : न्यायालयातघटस्फोटासाठी गेलेला खटला जोडप्याची ताटातूट झाल्यानंतरच संपतो. त्यानंतर मुलांच्या हक्कावरून व पोटगीवरून पुन्हा वाद होत असल्याची परिस्थिती आहे. मात्र प्रत्येक प्रकरणात असेच होईल असे नाही. अगदी सिनेमाची स्टोरी शोभावी, असे वळण पूनम आणि प्रवीण (नावे बदललेली) यांच्या घटस्फोटाच्या खटल्याने घेतली असून, त्यांचे हॅप्पी एंडिंग झाले आहे.
दावा दाखल करणे, त्यानंतर त्यांचे समुपदेशन आणि शेवटी निकाल असे घटस्फोटाचे साधारण तीन टप्पे आहेत. पूनम व प्रवीण यांचा खटला अंतिम टप्प्यात असताना त्यांना केलेल्या समुपदेशनामुळे दोघांनीही पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांच्या चिमुकल्या मुलालादेखील आई-वडिलांचा सहवास लाभणार आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पूनम व प्रवीण यांचे २४ जानेवारी २०१३ रोजी लग्न झाले होते. प्रवीण औषध वितरण कंपनीत कामाला तर पूनम ही गृहिणी आहे. सुमारे एक वर्ष त्यांचा संसार सुखात सुरू होता. मात्र त्यानंतर त्यांच्यात मतभेद होऊ लागले व त्याचे रुपांतर भांडणात झाले. पूनम ही त्यांच्या घरच्या व्यक्तींच्या सांगण्याप्रमाणे वागत आहे. याकाळात त्यांना एक बाळही झाले. वाद अगदी टोकाला गेल्याने २०१६ साली पूनम यांनी माहेरचा रस्ता धरला व सासरच्या व्यक्तींविरोधात खटला दाखल केला.
घटस्फोटाचे प्रकरण अंतिम युक्तीवादास ठेवण्यात आले होते. मात्र प्रविण यांचे वकील अॅड. झाकीर मनियार यांनी दोघांचेही समुपदेशन केले. त्यांना संसार मोडण्याच्या हट्टापासून परावृत्त केले व त्यांच्यातील गैरसमज देखील मिटवले. एवढेच नाही तर त्यांच्यात असलेली सुडाची भावना देखील संपवली. त्यातून दोघांनी पुन्हा एकत्र येण्याचे ठरवले. दोघांकडील कुटुंबियांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.