देहूगावामध्ये भरली हरिनामाची शाळा
By admin | Published: July 5, 2017 03:05 AM2017-07-05T03:05:33+5:302017-07-05T03:05:33+5:30
येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन देहू पंचक्रोशीतील भाविकांसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व श्री संत तुकाराममहाराज शिळामंदिरात दर्शन घेतले. दर्शनासाठी पहाटेपासूनच येथील मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. ती गर्दी दुपारनंतर हळूहळू वाढतच गेली. पहाटे संस्थानचे मुख्य पुजारी धनंजय मोरे यांनी साडेचार वाजता महापूजा व काकड आरती केली. पाच वाजण्याच्या सुमारास शिळामंदिरातील नैमित्तिक विधीवत महापूजा केली. महापूजा उरकल्यानंतर भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भाविकांच्या गर्दीमुळे देहूनगरीदेखील फुलून गेली होती. परिसरातील काही शाळांनी देखील एकादशीचा दिवस साधत दिंडीने मंदिरात येऊन दर्शन घेतले. दुपारनंतर स्थानिक भाविकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याच प्रमाणे जे भाविक थेट पंढरपूरच्या वारीला दाखल झाले होते त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी देहू व आळंदी येथे दर्शनासाठी गर्दी केली होती.
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालय व तळवडे येथील ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या पालखीसह दिंड्या देहूमध्ये आणल्या होत्या. मंदिराच्या आवारात त्यांनी विविध अभंगांचे गायन करीत मंदिर प्रदक्षिणा घालून आपल्या विद्यालयाकडे मार्गस्थ झाले. माळीनगर येथील श्रीकृष्ण महिला भजनी मंडळाने मंदिरात भजन गायन करीत सेवा रुजू केली. दुपारी आलेल्या भाविकांना एकादशीनिमित्त खिचडी व केळी वाटप तुषार बहिरट पाटील,सर्जेराव भोंगाडे, संकेत जाधव, विदूर पचपिंड, दीपक पिंजण, साजिस लबडे,गणेश माळी, प्रशांत शिवणेकर यांनी मंदिराच्या आवारात केले.
रात्री सात ते नऊपर्यंत पुरुषोत्तममहाराज मोरे यांचे ‘आता कोठे धावे मन’, ‘तुझे चरण देखलिया’ या अभंगाचे निरुपण करीत कीर्तनसेवा केली. गर्दीमुळे व आठवडे बाजार असल्यामुळे मंदिरापुढे वाहनांची मोठी गर्दी झाली.
नवलाख उंब्रे : ग्रामपंचायतीतर्फे वृक्षदिंडी
वडगाव मावळ : नवलाख उंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण केले. या वेळी मुलांनी वारकरी, तसेच विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा केली होती. या वेळी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते भरत ढमाले यांनी भोजन व्यवस्था केली होती. या वेळी सरपंच दत्तात्रय पडवळ, रवींद्र कडलक, सदस्य संदीप शेटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वायकर, नवनाथ पडवळ, सुभाष पापळ, तानाजी पडवळ, दिनकर शेटे, चिंधू बधाले, बाळासाहेब लोणकर, मुख्याध्यपक विजय चव्हाण उपस्थित होते. कडलक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप शेटे व आभार विजय चव्हाण यांनी मानले. सरपंच दत्तात्रय पडवळ, दिनकर शेटे व बाळासाहेब लोणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने कामशेत शहरात असलेल्या गावठाणमधील विठ्ठल रखुमाई मंदिरात सकाळपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यात मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने भाजीपाला विक्रेत्यांनीही या वेळी विठ्ठल रखुमाई दर्शनाचा लाभ घेतला. कामशेत शहरातील विठ्ठल रखुमाईचे मंदिर जुने असून सकाळी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला अभिषेक करून विधियुक्त पूजा करण्यात आली. महाप्रसाद व भजनाचे कार्यक्रम झाले. विठू नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.