देहूनगरीमध्ये हरिनामाचा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:33 AM2019-03-20T01:33:14+5:302019-03-20T01:33:44+5:30
जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे.
देहूगाव - जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे.
श्रीसंत तुकाराममहाराज संस्थान, पोलीस यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी आपआपल्या परीने कामाला लागली आहे. सध्या गावात धुराची फवारणी करण्यात येत आहे. आरोग्य पथकानेही त्यांचे काम सुरू केले आहे.
पोलीस यंत्रणा कार्यान्वित झाली असून, उद्यापर्यंत पुरेसा बंदोबस्त दाखल होईल. वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पंचवीस ते तीस फूट उंचीचा मनोराही उभारण्यात आला आहे. संस्थानच्या वतीने वैकुंठगमण मंदिराच्या समोर १०० फूट लांब व ७० फूट रुंद असा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. ही धामधूम व सोहळ्याची तयारी सुरू असतानाच भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाने इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडले असून, आज ते देहू येथे दाखल झाले आहे. बुधवारपर्यंत इंद्रायणी नदीच्या डोहात पुरेसा पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.
येथील जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिंडी समाज धर्मशाळेत तुकाराम बीजेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह १७ मार्चपासून सुरू झाला आहे. या निमित्ताने नितीनमहाराज काकडे, उमेशमहाराज दशरथे, कान्होबामहाराज देहूकर यांची कीर्तन सेवा झाली आहे. तर अॅड. जयवंतमहाराज बोधले, महादेवमहाराज राऊत, संजयमहाराज पाचपोर, अनिलमहाराज पाटील, पंढरीनाथमहाराज तावरे व सुरेशमहाराज साठे यांची कीर्तन सेवा होणार आहे. २५ मार्चला रामरावमहाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
शिवाय परिसरात इंद्रायणीकाठी, गाथामंदिर परिसर, विविध धर्मशाळांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सोहळ्याची सांगता बीजेच्या दिवशी काल्याच्या कीर्तन व महाप्रसादाने होणार आहे. गावात सध्या सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे. ठिकठिकाणी टाळमृदंगाच्या आवाजासह सूर ऐकू येत असल्याने सारा परिसर भक्तिमय झाला आहे.
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी मनोरा
वैकुंठगमन मंदिराच्या परिसरात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पंचवीस ते तीस फूट उंचीचा मनोराही उभारण्यात आला आहे. संस्थानच्या वतीने वैकुंठगमन मंदिराच्या समोर १०० फूट लांब व ७० फूट रुंद असा मंडप घालण्याचे काम सुरू आहे. बीज सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रदिवस काम करत आहे. तसेच देहूमध्ये हरिनामाचा जप सुरू आहे. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे.
नामसाधनेने अहंकार नष्ट होतो : नितीनमहाराज काकडे
देहूगाव : गाथा ही तुकोबारायांची मूर्ती आहे. संत तुकोबांच्या गाथेतील प्रत्येक अभंग मार्गदर्शक आहे. गाथेतील अनेक अभंगातून त्यांनी स्वत:चे गुण कमी मात्र दोष अधिक विशद केले आहेत. व्यवहार व परमार्थ वेगळा आहे, नामस्मरणाने काम, क्रोध दूर जातात. नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, नामस्मरणावर दृढविश्वास ठेवल्याशिवाय फळ मिळत नाही. नामसाधनेने अंहकार नष्ट होतो, असे प्रतिपादन कीर्तनकार हभप नितीनमहाराज काकडे यांनी श्रीक्षेत्र देहू येथे केले.
संत तुकाराममहाराज बीजोत्सवानिमित्त जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्या वतीने आनंदडोह रस्ता (श्रीक्षेत्र देहू) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या पहिल्या दिवशीच्या कीर्तनात काकडेमहाराज बोलत होते.
‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ या संत तुकाराममहाराजांच्या अभंगावर निरूपण केले. गायनसाथ लक्ष्मणमहाराज चाळक, बंडोपत खामकर, खडूंमहाराज मोरे, मृदंग साथ रवींद्रमहाराज चव्हाण यांनी केली.
दरम्यान रविवारी सकाळी वीणा, टाळ, कलश व मृदंग पूजन करून सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, हभप पंढरीनाथ तावरे, रवींद्रमहाराज ढोरे, हभप विठ्ठल भालेकर, चिंतामण भालेकर, दत्तात्रय तरस, मधुकर बोडके आदी उपस्थित होते.
सकाळी संतसेवा संघाचे अध्यक्ष हभप पंढरीनाथमहाराज तावरे यांच्या नेतृत्वाखाली गाथा पारायण सुरू झाले. हरिपाठ व कीर्तनसाथ पंचम वेद वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, हभप भगवानमहाराज जाधव व हभप सुखदेवमहाराज तांबे यांचे शिष्यगण यांनी केली.