गावाकडे जाणा-यांचा हिरमोड , एसटी बंद : चालक, वाहकांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:50 AM2017-10-18T02:50:19+5:302017-10-18T02:51:42+5:30
दिवाळी सुटी सुरू झाली... अनेकांनी गावी जाण्याची तयारी केली... एसटीचे आरक्षण करून ठेवले... गावाकडे जाण्याची तयारी झाली... कुटुंबासह वल्लभनगर आगार गाठले...तेथे गेल्यानंतर वाहक आणि चालकांनी पुकारलेल्या संपामुळे एकही
- जमीर सय्यद
नेहरूनगर : दिवाळी सुटी सुरू झाली... अनेकांनी गावी जाण्याची तयारी केली... एसटीचे आरक्षण करून ठेवले... गावाकडे जाण्याची तयारी झाली... कुटुंबासह वल्लभनगर आगार गाठले...तेथे गेल्यानंतर वाहक आणि चालकांनी पुकारलेल्या संपामुळे एकही एसटी आगारातून बाहेर पडणार नाही, असे सांगण्यात आले. उत्साहात गावाकडे निघालेल्यांचा हिरमोड झाला. अखेर मनस्तापासह प्रवाशांनी तिकिटाचे पैसे परत घेतले. खासगी वाहनातून दुप्पट व तिप्पट तिकीट दराने गावाकडे मार्गस्थ झाले.
महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला. त्यामुळे वल्लभनगर आगारातील १३० एसटी बसगाड्या मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आल्या. नियोजनाप्रमाणे मंगळवारी सकाळी गावाकडे जाण्यासाठी आगारात आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अचानक एसटी बसगाड्या बंद असल्याचे समजले. कुटुंबासह एसटी आगारात आलेले प्रवासी हताश, निराश झाले.
आगाराचे १५ लाखांचे नुकसान
दिवाळीच्या सुटीत एसटी गाड्यांना गर्दी होईल, हे लक्षात घेऊन अनेकांनी एसटी तिकिटाचे रिझर्व्हेशन केले होते.परंतु अचानक पुकारण्यात आलेल्या बंदमुळे एसटी बसगाड्या आगारात उभ्या राहिल्या. प्रवाशांनी रांग लावून तिकिटाचे पैसे परत घेतले. संपामुळे वल्लभनगर आगारातील एकूण १३० बंद ठेवण्यात आल्याने आगाराचे एका दिवसाचे १५ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी दिली.