हॅरिस पुलावरील कोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:59 AM2018-05-25T04:59:51+5:302018-05-25T04:59:51+5:30
पुणे-मुंबई महामार्ग : जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी मार्ग होणार खुला
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी आणि पुण्याला जोडणाऱ्या दापोडीतील हॅरिस पुलाला समांतर पूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे हरिस पुलावर होणारी वाहतूककोंडी सुटणार आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहराच्या सीमेवरील मुळानदीच्या तीरावर एकीकडे दापोडी व दुसरीकडे बोपोडी आहे. वाहतूक वाढल्याने तसेच बीआरटी, मेट्रोने वेग घेतल्याने शंभर वर्षांपूर्वीचा पूल हा अपुरा पडत होता. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण वाढत होते. ही कोंडी फोडण्यासाठी दोन्ही शहरांच्या महापालिकेने समांतर पूल उभारण्याचे काम सुरू केले होते. दापोडीतून खडकीत जाणाºया पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. याची पाहणी महापालिका अधिका-यांनी आज केली. या वेळी बीआरटीएसचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बीआरटी प्रवक्ता विजय भोजणे उपस्थित होते. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुलावर डांबरीकरण सुरू आहे. तसेच पादचारी मार्गावर रेलिंग बसविण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले.
हॅरिस पुलाच्या कामाला ६ एप्रिल २०१५ ला साठ कोटींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. १७ फेब्रुवारी २०१६ ला २२.४६ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली होती. या पुलासाठी सी. व्ही़ कांड यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. तर वालेचा इंजिनिअरिंगला हे काम देण्यात आले होते. या कामासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत २२ मे रोजी संपली आहे. मुदतीत काम पूर्ण होऊ शकले नाही. सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे.
समांतर दोन पूल
हॅरिस पुलाला दोन्ही बाजूंनी समांतर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. पुलाची लांबी ४१० मीटर असून, रूंदी १०.५० मीटर आहे. पुलावर संरक्षक कठडे, विद्युत विषयक कामे सुरू आहेत. तसेच सीएमईसाठी भुयारी मार्गही काढण्यात आला आहे. बोपोडीतून पिंपरीकडे येणारा पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, भूसंपादनामुळे नदीतीरावरील रस्त्याला जोडण्याचे काम अपूर्ण आहे. भूसंपादन होताच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
वर्षाची मुदतवाढ
पुणे महापालिका हद्दीतील रस्त्यालगतच्या झोपड्या हलविलेल्या नाहीत. जागेचा ताबा न मिळाल्याने पूल तयार होऊनही तो जागेअभावी बोपोडीला जोडला गेला नाही. यासाठी पुणे महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. मात्र, भूसंपादन कारवाई न झाल्याने जागेअभावी पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या कामास एक वर्षांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
पावसाळ्यात काम बंद
मुळा नदीवरील हॅरिस पुलाच्या एका समांतर पुलाचे काम अपूर्ण आहे. जागेअभावी काम रखडले आहे. अजूनही जागा मिळालेली नाही. पाऊस कोणत्याही क्षणी सुरू होईल. त्यामुळे पावसाळ्यात चार महिने या पुलाचे काम करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासनास पुलाचे काम थांबवावे लागणार आहे.