'महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री होतं'; भाजप नेते राम कदमांची सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:19 PM2022-09-26T15:19:03+5:302022-09-26T15:25:13+5:30
भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांचा घणाघात...
- प्रकाश गायकर
पिंपरी : दोन दिवसांपूर्वी पेंग्विन सेनेचे नेते आले होते. त्यांनी सांगितलं वेदांता भाजपामुळेगुजरातला गेली. मात्र हे पाप महाविकास आघाडी सरकारने केले नसते तर तुमच्या-आमच्या पोरांना वणवण फिरावे लागले नसते. अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे मोजून पाच वेळा मंत्रालयात गेले, कसे आपल्याकडे प्रकल्प येतील. कंपनीचे लोक सांगत होते की, आम्हाला महाराष्ट्रात कंपनी टाकायची आहे. त्यावेळी हे वसुली बहाद्दर आम्हाला किती देणार असे बोलत होते. त्यांच्या या पापामुळे वेदांता बाहेर गेली असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी सोमवारी (दि. 26) केला.
मावळ तालुक्यात नियोजित असलेल्या वेदांता फॉक्सकॉन कंपनीचे गुजरातमध्ये स्थलांतर झाले. याला जबाबदार महाविकास आघाडी सरकार असून तत्कालीन आघाडी सरकारने जनतेची दिशाभूल केली असल्याचे भाजप युतीकडून सांगितले जात आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात मावळ भाजपा, शिंदे गट व आरपीआय यांच्यावतीने सोमवारी (दि. 26) वडगावमधील पोटोबा मंदिर ते पंचायत समिती या दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर वडगाव पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी मार्गदर्शन करताना राम कदम बोलत होते.
कदम म्हणाले, कंपनी सांगत होती आम्हाला राज्यात तळेगावमध्ये प्रकल्प सुरू करायचा आहे. मात्र मुख्यमंत्री तोंडावरील मास्क काढायला तयार नव्हते. मविआमधील लोक खोटं सांगत आहेत. जर कंपनी आली होती तर करार दाखवा, भूसंपादन झाले होते तर सर्व्हे नंबर सांगा. आम्ही यापुढे राज्याच्या गावागावात जाऊन खरे सांगू की कंपनी कोणामुळे बाहेर गेली. आदित्य ठाकरे यांच्यामध्ये थोडी नैतिकता शिल्लक असेल तर खोटं बोलल्याबद्दल त्यांनी राज्यातील जनतेची जाहीर माफी मागावी असेही राम कदम म्हणाले.
मविआ दळभद्री सरकार होतं
जगाच्या इतिहासामध्ये एकमेव घटना अशी आहे जिथे मंत्री सोडून गेले. तीन पक्षांचे जे सरकार होते ते खऱ्या अर्थाने फुटक्या पायाचे होते. त्याचबरोबर मविआचे सरकार हे दळभद्री सरकार होतं. सत्तेत आल्यापासून सगळे बंद अशी अवस्था होती. मंदिरे बंद आणि दारूचे दुकाने सुरू होती. मात्र राज्यात एका विचाराचे आमदार, खासदार एकत्र आले. एका विचाराचे शिंदे-फडणवीस सरकार आले आणि सर्व सण उत्सव सुरू झाले असे राम कदम म्हणाले.
एक कोटी रुपयांचे बक्षीस जिंका
मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे दहा मिनिटेसुद्धा घराबाहेर पडत नव्हते. ते मंत्रालयात देखील मोजून पाच वेळा गेले, सहाव्या वेळेस गेले असतील तर दाखवा आणि एक कोटी रुपये जिंका अशी ऑफर आमदार राम कदम यांनी यावेळी दिली.