तुमच्या बाळाला गोवरची लस दिली का? काळजी घेण्याचे वैद्यकीय विभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 02:50 PM2022-11-17T14:50:51+5:302022-11-17T14:51:17+5:30
गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे, पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो...
पिंपरी : मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गोवरचे रुग्ण सापडले नसले तरी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो.
अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणे या आजाराची प्रमुख लक्षणे मानली जातात. सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणे दिसतात. तसेच डोळे लाल होऊ शकतात. बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो. प्रामुख्याने पाच वर्षांखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबीयांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मुलांना गोवरची लक्षणे असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. तसेच गोवर हा वेगाने पसरणारा आजार असल्याने लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसल्यास बालकास तातडीने नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सद्यस्थितीत गोवर रुग्ण आढळले नाहीत. मात्र, आपल्या घरातील लहान बालकांना गोवर आजार होऊ नये यासाठी ९ महिन्यांचे बालक आणि १६ महिन्यांच्या बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. कोणत्याही कारणास्तव पालकांनी ही लस मुलांना दिली नसेल तरी पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना ही लस देता येते. याचे लसीकरण दर गुरुवारी मनपा दवाखाना व रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी सकाळी ९.३० ते ३.३० या कालावधीत मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.