रहाटणीत १० अनधिकृ त बांधकामांवर हातोडा, महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:09 AM2019-02-08T01:09:43+5:302019-02-08T01:10:02+5:30
महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई करण्यात आली. रहाटणी प्रभाग क्र.२७ परिसरातील १० वाढीव व नव्याने बांधलेली आरसीसी, वीटबांधकाम इ. अनधिकृत अंदाजे ५२००.०० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली.
रहाटणी : महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाई करण्यात आली. रहाटणी प्रभाग क्र.२७ परिसरातील १० वाढीव व नव्याने बांधलेली आरसीसी, वीटबांधकाम इ. अनधिकृत अंदाजे ५२००.०० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली.
गेल्याकाही दिवसांपासून महापालिकेची अनधिकृत बांधकामावरील कारवाई पुन्हा एकदा जोमात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एक गुंठा अर्धा गुंठ्यात ज्या नागरिकांचे बांधकाम आहे. त्यांनाही महापालिका प्रशासनाने नोटीस दिली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. कारवाईचे सत्र सुरू झाल्याने व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत.
प्रभाग क्रमांक २७ राहटणी -श्रीनगर परिसरातील तापकीर मळा चौकाजवळ यासह डी-मार्ट मॉल समोरील आरसीसी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
या संबंधित मिळकतधारकांना धोकादायक बांधकाम काढून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. कारवाई काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर अग्निशमन दल व रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पोलिसांसह वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
आवाहन : परवानगी घेऊनच बांधकाम करावे
अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होतच आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी परवाना घेऊनच बांधकामे करावित. अन्यथा कारवाई करण्यात येईल. गुंतागुंत कमी करून बांधकाम परवाना सहज मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू आहे. त्याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी महापालिका करीत होते.
१ जेसीबी, १ डम्पर, १० मजूर, २ ब्रेकर आणि मनपाचे १० पोलीस कर्मचारी अधिकारी, वाकड पोलीस स्टेशन १५ पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने कारवाई झाली. ‘ग’ प्रभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली व १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता यांच्यासह ७ क्षेत्र अधिकारी, १० मनपा कर्मचारी यांचे पथकाने ही कारवाई केली.