प्रेयसीचा खून करून मृतदेह टाकला खंबाटकी घाटात; वाकड येथील घटना
By नारायण बडगुजर | Published: November 27, 2024 08:53 PM2024-11-27T20:53:11+5:302024-11-27T20:53:11+5:30
पोलिसांनी १२ तासांत गुन्ह्याची उकल करून या प्रकरणी प्रियकराला याला अटक केली
पिंपरी : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने सतत पैशांची मागणी केल्याने तसेच चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने तिचा खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये खंबाटकी घाटात मृतदेह फेकून दिला. वाकड येथे सोमवारी (दि. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
दिनेश पोपट ठोंबरे (३२, रा. बहुर, पो. करुंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. जयश्री विनय मोरे (२७, रा. मारुंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर जयश्री पतीसोबत राहत नव्हती. तर, हिंजवडी येथील एका कंपनीत सुपरवायजर असलेला दिनेश याचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. दिनेश हा सोशल मीडियावर विविध पोस्ट करायचा. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी दिनेश आणि जयश्री यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून जयश्री आणि दिनेश हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे. जयश्री आणि दिनेश यांचे काही दिवसांपासून पटत नव्हते. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करत होती. वेगळे राहायचे म्हणत होती. रविवारी (दि. २४) ते दोघेही भूमकर चौक येथे गाडीत असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत हातोडीने जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीचा मृत्यू झाला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिनेश हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात जयश्रीचा मृतदेह फेकला. त्यानंतर दिनेश पिंपरी- चिंचवडमध्ये परतला. सोमवारी (दि. २५) त्याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, जयश्रीचे वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासाची चक्रे फिरवली असता यामागे दिनेश असल्याचे पोलिसांच्या समोर आले. दिनेश याने तीन वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिले. पोलिसांनी याबाबतची पोस्ट देखील व्हायरल केली होती. तांत्रिक विश्लेषण करून वाकड पोलिसांनी १२ तासांत गुन्ह्याची उकल करून या प्रकरणी दिनेश याला अटक केली.
सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे, भारत माने, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, पोलिस अंमलदार वंदु गिरे, नामदेव वडेकर, रामचंद्र तळपे, तात्यासाहेब शिंदे, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.