मैत्रिणीच्या हौसेसाठी त्यांनी सुरु केला चोरीचा उद्योग; २६ मोबाईल, तीन दुचाकी केल्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 05:31 PM2021-01-14T17:31:29+5:302021-01-14T17:32:19+5:30
दोघे चोरटे जाळ्यात; ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज जप्त
पिंपरी : मैत्रिणीची हौस पुरविण्यासाठी दोघांनी चक्क मोबाईल चोरीचा उद्योग सुरु केला. दरोडा विरोधी पथकाने दोघा चोरट्यांना जेरबंद करुन, त्यांच्याकडून तब्बल २६ मोबाईल फोन आणि तीन दुचाकी जप्त केल्या. ही दुकली मैत्रिणीला वेळोवेळी
वेगळा मोबाईल देत तिच्यावर पाडत असल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी सागर मोहन सावळे (वय २२, रा. अष्टविनायक चौक, मोरे वस्ती, चिखली), नीलेश देवानंद भालेराव (वय १९, रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) यांना जबरी चोरीच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन चोरीच्या दुचाकी, २६ मोबाईल फोन असा ४ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. दुचाकीवरुन आलेले चोरटे पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेण्याच्या आणि सोनसाखळी चोरी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उकल न झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमले होते.
भोसरीतील पीएमपी बस थांब्याजवळील पुलाखाली मोबाईल हिसकावणारे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना खबऱ्याने दिली होती. त्या नुसार दरोडा विरोधी पथकाने तीन पथके नेमून सापळा रचला. तब्बल सहा तासांच्या प्रतिक्षेनंतर संशयित जाळ्यात अडकले. त्यांच्याकडे आठ मोबाईल आणि एक दुचाकी आढळली. अधिक तपासात त्यांनी २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचे २६ मोबाईल फोन आणि १ लाख ७० हजार रुपयांच्या तीन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. मैत्रिणीवर छाप पाडण्यासाठी ते मोबाईल फोन चोरत होते. ते, मैत्रिणीला वेळोवेळी फोन बदलून द्यायचे. तसेच काही फोनची विक्री करुन मौज मजा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरीतील तीन, एमआयडीसी भोसरीतील दोन, भोसरी पोलीस ठाण्यातील तीन आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची उकल झाली आहे.
---------------
मोबाईल फोन हिसकावल्यास येथे संपर्क करा
रस्त्याने पायी जात असताना मोबाईल फोनवर बोलताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी. आजुबाजुला लक्ष द्यावे. ज्यांचे मोबाईल हिसकावले आहेत, त्यांनी दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या कासारवाडी येथील कार्यालयाच्या ८८०५३३३०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी केले आहे.