कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना

By नारायण बडगुजर | Published: July 29, 2024 04:10 PM2024-07-29T16:10:55+5:302024-07-29T16:11:51+5:30

स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी असून त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले तर बाकी विद्यार्थ्यांना सुखरूप बसमधून बाहेर काढण्यात आले.

Head on collision between car and schoolbus Two students injured along with driver incident at Chinchwad | कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना

कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक; चालकासह दोन विद्यार्थी जखमी, चिंचवड येथील घटना

पिंपरी : आलिशान कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक झाली. यात कार चालक आणि दोन विद्यार्थी जखमी झाले. चिंचवड येथील आटो क्लस्टर येथे बीआरटी मार्गात सोमवारी (दि. २९) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा अपघात झाला. 

यश मित्तल (२९, रा. आकुर्डी) असे जखमी कारचालकाचे नाव आहे. पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश मित्तल हा त्याच्या ताब्यातील कार घेऊन आटो क्लस्टर येथील बीआरटी मार्गातून जात होता. त्याचवेळी एका खासगी शैक्षणिक संस्थेची स्कूलबस बीआरटी मार्गातून समोरून येत होती. कार आणि स्कूलबसची समोरासमोर धडक झाली. यात कारचे तसेच स्कूलबसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

स्कूलबसमध्ये १५ विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बीआरटी मार्गाच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली. 

बीआरटी मार्गात घुसखोरी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील विविध मार्गांवर बस रॅपिड ट्रांजिट (बीआरटी) काॅरिडाॅर उभारले आहेत. पीएमपीएमएल बससेवा अधिक सक्षम होण्यासह प्रवाशांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी या काॅरिडाॅरची निर्मिती केली. केवळ पीएमपीएमएल बसलाच या बीआरटी मार्गात प्रवेश आहे. मात्र, तरीही इतर वाहनांची या मार्गात घुसखोरी होते. परिणामी अपघात होतात. आटो क्लस्टर येथील अपघातात अशाच पद्धतीने स्कूल बस आणि कारचालकाने घुसखोरी केली असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Head on collision between car and schoolbus Two students injured along with driver incident at Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.