डास मारण्याची ‘बॅट’ आयुक्तांना भेट, अस्वच्छ नदीपात्रामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:12 AM2018-04-04T03:12:17+5:302018-04-04T03:12:17+5:30
गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.
पिंपळे गुरव - सांगवी-पिंपळे गुरव भागात नदीतील पाण्यात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. महापालिकेकडून मुळा आणि पवना नद्यांची साफसफाई होत नाही. त्याचबरोबर गटारांची कामे अर्धवटच राहिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अतुल शितोळे आणि राजेंद्र जगताप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत डास मारण्याची बॅट भेट देण्यात आली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगवी-पिंपळे गुरव परिसरात मुळा आणि पवना नदी आहे. या नदीची साफसफाई होत नाही. त्याचबरोबर गटारांची अर्धवट कामे यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरियासारख्या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. याला महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविले आहे. लाखो रुपये जाहिराती, फलकबाजी, पत्रकबाजी यासाठी खर्च केले आहेत. प्रत्यक्षात मात्र स्वच्छता झालेली नाही. मुळा आणि पवना नदीमध्ये आजही कारखान्याचे रासायनिक पाणी, त्याचबरोबर भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण न झाल्याने मैला आणि सांडपाणी थेट पवना नदीत सोडण्यात येत आहे. रासायनिक पाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे अनेक वेळा मासे मेल्याचेही आढळून आले आहे. नदीतील जीवनसृष्टी यामुळे नामशेष होण्याचा मार्गावर आहे. कासट पेपर मिल आणि पद्मजी पेपर मिलचे पाणीही नदीत सोडले जाते. यामुळे मोठे प्रदूषण निर्माण होत आहे.
नदीसुधार प्रकल्पाचे पुढे काय झाले माहिती नाही; मात्र आता नदीसुधार प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान हे स्वप्न आहे. आपण स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास पंतप्रधानांचे स्वप्न कागदावरच राहील. त्यामुळे आपण स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहा आणि गटाराची कामे पूर्ण करून नदी स्वच्छ करण्याचे कार्य हाती घ्या, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान शहरातील इतर भागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. प्रशासनाने दक्षता घेण्याची गरज आहे.
महापालिका प्रशासने याचा गांभीर्याने विचार केला नाही, म्हणून आज हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सांगवी आणि पिंपळे गुरव ही दोन्ही गावे नदीकाठी आहेत. संपूर्ण शहराची घाण या ठिकाणी येत असल्याने चंद्रमणीनगर, एस. टी. कॉलनी या भागात नदीतील पाण्यात दुर्गं धी पसरलेली आहे. शिवाय डासांचे साम्राज्य वाढल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुरीकरण आणि रासायनिक पावडर वापरली जाते. मात्र सांगवी-पिंपळे गुरव परिसरात याचा कधीच वापर केला जात नाही. मग हा कागदोपत्री खर्च दाखविला जातो का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.