दूषित पाणी सोडल्याने आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:40 AM2018-07-23T00:40:53+5:302018-07-23T00:41:25+5:30
दुतर्फा जलपर्णी वाढत असल्याने डासांचा वाढता प्रादुर्भाव; प्रशासनाचे दुर्लक्ष
- चंद्रकांत लोळे
कामशेत : इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असून, संबंधित परिसर दलदलयुक्त झाला आहे. रेल्वे स्टेशन जवळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पंपाजवळ शहरातील गटारांचे दूषित पाणी, बाजारपेठेतील सांडपाणी, रेल्वे वसाहतीचे व रेल्वे स्टेशन शौचालयाचे सांडपाणी एकत्रितरित्या नदीपात्रात जाऊन इंद्रायणी नदी दूषित होत आहे. दूषित पाण्याने व दलदलीने नदी पात्राच्या दुतर्फा जलपर्णी वाढत आहेत. पावसाळ्यात इंद्रायणी नदीत वाहून येणाऱ्या जलपर्णी, सांडपाणी, कचरा यामुळे इंद्रायणी नदीची गटारगंगा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
मावळातील अनेक प्रमुख शहरे व गावांना इंद्रायणी नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत असून, नदी परिसरातील शेतीच्या सिंचनासाठीही उपयोग होतो. पण गेल्या काही वर्षांपासून वाढत्या शहरीकरणामुळे इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित होऊ लागले आहे. परिणामी या नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करणाºया भागांमध्ये रोगराई पसरण्याची भीती अनेक सामाजिक संघटना व जागृत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कामशेत शहरात पिण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वापर होत असून, मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचे प्रदूषण होत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू शकते. इंद्रायणी नदीचे पाणी अनेक ठिकाणी प्रदूषित केले जात असून, यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. नाणे रोडच्या इंद्रायणी पुलाच्या परिसरात नदीपात्रात वाहने धुतली जातात. तसेच येथे अनेक जागी राडारोडा, मातीचे ढिग, अन्न पदार्थ व निर्माल्याचे ढिग मोठ्या प्रमाणात टाकल्यामुळे नदीपात्र अरुंद होत चालले आहे. इंद्रायणी नदीच्या घाटांवर याच दूषित पाण्यात अनेक महिला कपडे धुवतात. नागरिक व लहान मुले आंघोळी करत असताना दिसतात. हे आरोग्यास हानिकारक ठरत आहे.
शहरात पिण्यासाठी इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वापर होत आहे. या नदीच्या दोन ठिकाणी शहराला पाणीपुरवठा करणारे पंप हाऊस आहेत. त्यातील कामशेत रेल्वे स्टेशनच्या सुरुवातीला असणाºया पंप हाऊसजवळच नदीवर छोटा घाट आहे. येथे नागरिक व महिला नेहमीच कपडे धुणे, अंघोळी साठी येत असतात. याच ठिकाणी काही अंतरावर मोठ्या प्रमाणात शहराचे सांडपाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू शकते. या नदी परिसरात दलदल झाली असून, काळ्याभोर रंगाचे सांडपाणी नदीपात्रात मिसळले जात आहे. इंद्रायणी नदीचे पाणी अनेक ठिकाणी प्रदूषित केले जात असून, यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की शहरातील सर्वच भागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होतो आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ग्रुप ग्रामपंचायत यांच्या पाणीपुरवठा विभागामार्फत स्थानिकांना होणारा पिण्याचा पाणीपुरवठ्यातून नळाद्वारे येणारे पाणी गडद हिरव्या रंगाचे असते. त्यावर तेलकट तवंग तसेच वेगळाच वास ही येत असल्याची सर्वच नागरिक तक्रार करीत आहेत. दूषित पाण्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.