दमदार पावसाने सुखावला बळीराजा

By admin | Published: June 10, 2017 02:03 AM2017-06-10T02:03:41+5:302017-06-10T02:03:41+5:30

शुक्रवारी सायंकाळी लोणावळा परिसर आणि मावळ तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

Heavy rain dried up; | दमदार पावसाने सुखावला बळीराजा

दमदार पावसाने सुखावला बळीराजा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : शुक्रवारी सायंकाळी लोणावळा परिसर आणि मावळ तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. हा पाऊस खरिपाच्या तयारीसाठी अतिशय पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शहर व परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने चांगलीच हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची रिपरिप सुरू होती. काही दिवसांपासून लोणावळा परिसरात सायंकाळच्या सुमारास आभाळात ढग दाटून पावसाचा शिडकाव होत होता. शुक्रवारी सकाळपासूनच लोणावळ्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास काळ्या ढगांची हवेत दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली.
लोणावळा शहरासह परिसरातील वाकसई, वरसोली, कुसगाव, डोंगरगाव, औंढे, औंढोली, देवघर, कार्ला, पाटण, मळवली, वेहेरगाव, दहिवली, शिलाटणे, टाकवे या सर्व गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. भातरोपांची पेरणी झाली असल्याने बळीराजा पावसाची वाट पाहत असताना झालेले मॉन्सूनचे आगमन हे सुखकारक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
लोणावळा नगर परिषदेकडून प्रलंबित राहिलेल्या इंद्रायणी नदी सफाईच्या कामालाही दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. हे काम लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.
शेतकऱ्यांचे चेहरे खुलले
कामशेत : गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊनही हुलकावणी देणाऱ्या पावसाने अखेर कामशेतमध्येही दमदार हजेरी
लावली.
गेले काही दिवस ढगाळ हवामान तयार होऊन सोसाट्याचा वारा येत होता. पण, पाऊस पडत नव्हता. दर वर्षी ७ जूनला मावळात हमखास पडणारा पाऊस या वर्षी पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. अनेकांच्या भात पेरण्या रखडल्या होत्या. पण, शुक्रवारी दुपारनंतर कामशेतसह मावळातील अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे चेहरे खुलले आहेत.
कामशेत येथे दुपारनंतर पाऊस सुरू झाला. नंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला. अनेक नागरिक व प्रवाशांची यामुळे मोठी धावपळ उडाली. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. शहरातील किरकोळ विक्रेत्यांना दुकाने आवरती घ्यावी
लागली.
पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मुलांनी लुटला. पावसापासून वाचण्यासाठी अनेकजण रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये, तसेच मिळेल त्या आडोशाला थांबताना दिसत होते. अनेक हॉटेल व चहाच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती.
गहुंजेत मोठ्या पावसाची प्रतीक्षा
किवळे : रावेत, किवळे, देहूरोड, गहुंजे, सांगवडे परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहापासून हलक्या पावसाला सुरुवात झाली. मात्र, परिसरातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
किवळे व गहुंजे परिसरातील पवना नदीच्या पाण्याची सोय उपलब्ध असल्याने काही शेतकऱ्यांनी भात बी पेरले असून उगवलेल्या रोपांसाठी हा पाऊस अत्यंत पोषक असला तरी भात रोपांच्या वाढीसाठी खरीप हंगामातील इतर पिकांच्या पेरण्यांसाठी जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना या पावसाच्या हलक्या सरींनी काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या अखेरीला व जूनच्या सुरुवातीला धूळ वाफेवर व पाण्याची सोय असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पाऊस पडण्याच्या शक्यतेने भाताची पेरणी केली होती. मात्र, वळवाच्या पावसाने हुलकावणी दिली होती. पुरेसा पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. पावसाचे काहीसे दिलासादायक आगमन झाल्याने शेतकरी पावसाबाबत आशावादी बनला असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत आहे. सायंकाळी सातपर्यंत पाऊस सुरू होता.

Web Title: Heavy rain dried up;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.