लोणावळा शहरात 24 तासात 285 मिमी पावसाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 08:36 AM2018-07-16T08:36:08+5:302018-07-16T08:41:04+5:30

लोणावळा परिसरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे

heavy rain in lonavala | लोणावळा शहरात 24 तासात 285 मिमी पावसाची नोंद 

लोणावळा शहरात 24 तासात 285 मिमी पावसाची नोंद 

googlenewsNext

लोणावळा : लोणावळा शहरात मागील 24 तासात तब्बल 285 मिमी पाऊस झाला आहे. शनिवारी (14 जुलै) रात्रीपासून लोणावळा परिसरात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु असल्याने सर्व परिसर जलमय झाला आहे. जोरदार पावसामुळे शहरवासियांचे जनजीवन विस्कळीत झाले असून इंद्रायणी नदीला पूर आला आहे.

पावसाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहरात 4 जुलैपासून पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाने शनिवारी रात्रीपासून रौद्र रुप धारण केल्याने अवघ्या 24 तासात 285 मिमी (11.22 इंच) पाऊस झाला आहे. पवना धरण परिसरात मागील 24 तासात 154 मिमी पाऊस झाला असून धरणात 63.17 टक्के पाणीसाठा झाला आहे. मावळ तालुक्यातील वाडिवळे धरण 77.16 टक्के, आंद्रा धरण 78.31 टक्के तर कासारसाई धरण 81.20 टक्के भरले आहे. टाटा कंपनीच्या वलवण व शितोरा धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मुसळधार पावसामुळे लोणावळा व मावळ भागातील ओढ्यानाल्यांना पुराचे स्वरुप आले असून धबधबे ओसंडून वाहत असल्याने नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पर्यटकांनी देखील डोंगरभागातील धबधबे तसेच पर्यटनस्थळांवर जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भुशी धरण व लायन्स पॉईंटकडे जाणार्‍या रस्त्यावरुन पाणी वाहत आल्याने त्या भागात कोणीही जाण्याचा प्रयत्न करु नये असे सांगण्यात आले आहे. वाकसई, कार्ला, कामशेत परिसरात इंद्रायणीला पूर आला असून नदीकाठच्या भागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: heavy rain in lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.