लोणावळा शहरात जोरदार पाऊस
By Admin | Published: November 23, 2015 12:45 AM2015-11-23T00:45:21+5:302015-11-23T00:45:21+5:30
रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास लोणावळा शहरात व खंडाळा परिसरात जोरदार पाऊस पडला़ सुमारे एक तास पावसाचा जोर कायम होता़
लोणावळा : रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास लोणावळा शहरात व खंडाळा परिसरात जोरदार पाऊस पडला़ सुमारे एक तास पावसाचा जोर कायम होता़ ग्रामीण भागात मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरात प्रचंड उकाडा होता़ दिवाळी सुटीमधील शेवटच्या रविवारी पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना हा पाऊस म्हणजे पर्वणी ठरला़ सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढली होती़ त्यातच अचानक दुपारी पाऊस पडल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला़ ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भातकापणीची कामे सुरू आहेत.
काही ठिकाणी कडधान्याची पेरणी करण्यात आली असल्याने हा पाऊस ग्रामीण भागात पडला, तर मोठे नुकसान होणार असे वाटत होते. मात्र, सुदैवाने पावसाने ग्रामीण भागात न बरसता पाऊस शहरात पडला.यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली होती़ रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते़ एसटी स्थानकाच्या दोन्ही बाजूंना, तसेच राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. कामशेत परिसर, कार्ला येथे जोरदार पाऊस झाल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. तळेगावलही पावसाने हजेरी लावली.