पिंपरी चिंचवड परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; काही भागात वीजपुरवठा खंडित
By विश्वास मोरे | Published: May 19, 2024 05:35 PM2024-05-19T17:35:18+5:302024-05-19T17:35:35+5:30
अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली
पिंपरी: पिंपरी- चिंचवड मधील हवामानात बदल झाला आहे. मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी जोरदार पाऊस असा संमिश्र हवामानाचा अनुभव शहरात येत आहे. रविवारी सायंकाळी ढगांच्या गडगडटासह अर्ध्या तासांमध्ये शहरात पाऊस पडला.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे आगमन झाले. आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी तीन नंतर आकाशात ढग जमायला सुरुवात झाली. सायंकाळी पाचच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर हलक्या पावसाचे सरी बरसत होत्या. तसेच ढगांचा गडगडाटही सुरू होता.
तापमानात होते घट!
लोणावळा, लवासा आणि लवळेतील तापमानात घट झाली आहे. आज सर्वात कमी तापमान ३४अंश सेल्सियस लोणावळ्यात आणि दापोडीत नोंदविले गेले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकी वरून सायकल वरून घरी परतणाऱ्या कामगार वर्गाची तारांबळ उडाली होती. शहरातील सखल भाग असणाऱ्या भागांमध्ये पाण्याची छोटी तळी असल्याचे दिसून आले.
बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम!
पिंपरी चिंचवड शहरात रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सायंकाळच्या वेळी पिंपरीतील कॅम्प बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, अचानक आलेल्या पावसाने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, किराणा दुकानांमध्ये सायंकाळच्या वेळी गर्दी कमी दिसून आली. पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत ही गर्दीवर परिणाम झाला.
पिंपरी आणि चिंचवड परिसरातील वीज झाली गुल
विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे पिंपरी परिसरातील पिंपरी कॅम्प, खरळवाडी, मोरवाडी, गावठाण तसेच चिंचवड परिसरातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.