मावळ व कामशेत परिसराला वादळी वाऱ्याने झोडपले; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:45 PM2020-06-04T16:45:20+5:302020-06-04T17:00:09+5:30
विविध भागात अनेक झाडे व विजेचे खांब पडले, वीज पुरवठा बुधवारपासून खंडित
मावळ / कामशेत : अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर थैमान मांडले होते. सोसाट्याचे वारे व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घराचे पत्रे उडाले, विजेचे खांब पडले, काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या, रस्त्यावर विजेच्या तारा पडल्या, महामार्ग द्रुतगती मार्ग येथे जाहिरात होर्डिंग कोसळले आदी घटना घडल्या आहेत. मावळात वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण मावळ बुधवार पासून अंधारात बुडाले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने मावळात बुधवारी सकाळ पासून पावसाची सुरुवात झाली. बहुतेक ठिकाणी पाऊस कमी पण सोसाट्याचे वारे वाहत होते. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. बुधवारी सायंकाळ नंतर पावसाचा व वाऱ्याचा जोरही वाढला होता. मावळात सर्वत्र निसर्ग चक्रीवादळाने हाहाकार सुरू होता. बुधवारी दुपार नंतर ठिकठिकाणी बाजारपेठा ओस पडल्या होत्या. संपूर्ण मावळ तालुक्यावर या वादळाचा प्रभाव पडल्यामुळे अनेक ठिकाणी जुने वृक्ष उन्मळून पडले. तर विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.
अरबी समुद्रावर निसर्ग चक्रीवादळाचा जोर वाढल्यानंतर मावळातील प्रमुख शहरात स्थानिक प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वादळ, वारा, वीज तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांपासून सावधानतेचा इशारा देण्यात येत होता. या वादळाचा ग्रामीण भागात ही मोठा फटका बसला असून शेती व घरांचे नुकसान झाले आहे.
............................
सांगवडेत शेतकऱ्याच्या काही घरांचे व चाळीचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाल्याने १२ जण जखमी
गहुंजे : सांगवडे , दारूंब्रे रस्ता भागात शेतकऱ्याच्या काही घरांचे व चाळीचे पत्रे वादळी वाऱ्याने उडाल्याने १२ जण जखमी झाले आहेत. दारूंब्रे कारखाना रस्ता येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गेल्या महिन्यात बांधलेल्या शेततळ्याचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले आहे. विविध भागात अनेक झाडे व खांब पडले असून बुधवारी खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही.
निसर्ग वादळामुळे पवना मावळातील सांगवडेतील ज्ञानेश्वर दिमाख राक्षे यांचे शेतातील घरासह चाळीचे पत्रे उडून गेले असून त्याठिकाणी राहणारे १२ जण जखमी झाले आहेत. सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात तिघांवर उपचार सुरु असून इतरांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
सुरेखा सचिन घोटकुले (वय ४०) ही महिला तसेच साक्षी ज्ञानेश्वर राक्षे (वय १२ ) गौरी रणजित खंडागळे(वय १२) या दोन मुली जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . ज्ञानेश्वर राक्षे यांच्यासह ९ जणांना उपचारानंतर रात्री उशिरा घरी सोडण्यात आले आहे.वादळी वाऱ्याने घराचे व चाळीचे सर्व पत्रे उडाले असून चाळीत व घरात राहणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे .