पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान

By विश्वास मोरे | Published: July 24, 2024 03:59 PM2024-07-24T15:59:32+5:302024-07-24T16:00:37+5:30

गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून झाडपडी, वाहनांचे नुकसान याबरोबरच एका ठिकाणी आगीची घटना घडली

Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval Incidents of falling trees damage to vehicles | पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान

पिंपरी- चिंचवड आणि मावळात जोरदार पाऊस सुरू; झाडपडीच्या घटना, वाहनांचे नुकसान

पिंपरी: मावळ आणि पिंपरी- चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पवनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी पावणेदोन या वेळेत आठ ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे वाहनाचे नुकसान आणि वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तर एका ठिकाणी आगीची घटना घडली आहे. 

पिंपरी- चिंचवड तसेच मावळ परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोणावळा परिसरात तर पावसाचा वेग अधिक आहे. तिथे २७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पवना नदीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे चिंचवडमधील महासाधू मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे. तसेच शहरातील विविध भागात सकाळपासूनच पाऊस सुरु होता. त्यामुळे सकाळी पहिल्या पाळीला कामास जाणाऱ्या कामगारांना, तसेच शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागला. रेनकोट घालून आणि छत्र्या घेऊन मुले शाळेत जातांना दिसून आली. तसेच सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी आज व्यायाम करण्याचे टाळले. 

या भागात पडली झाडे आणि झाली वाहतूककोंडी 

तसेच पिंपरी- चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये काल दिवसभर तसेच रात्री आणि बुधवारी दिवसभर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. पिंपळे गुरव सुदर्शन चौक येथे सकाळी सात वाजता झाड पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर साडेसात वाजता नवी सांगवी जिल्हा रुग्णालय येथे झाड पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास चिंचवड येथील टाटा मोटर्ससमोर एक झाड पडल्याची माहिती, कुदळवाडी चिखली येथील मोरेवस्ती परिसरात सव्वा अकरा वाजता झाड पडल्याचे समजले. त्यानंतर चिंचवड गावातील बिर्ला हॉस्पिटलजवळ दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी झाड पडल्याची माहिती मिळाली. दुपारी एकच्या सुमारास थेरगाव डांगे चौक येथे आणि  दुपारी एक वाजता पिंपरी वैभवनगर येथे झाड पडले. पावणे दोन वाजता पिंपरीतील झिरो बाईज चौक एक भिंत कोसळण्याची माहिती मिळाली त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन झाडे हटविले. वाहतूक सुरळीत केली. झाडपडीच्या घटनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर प्राधिकरण सेक्टर २३ मध्ये  आग लागण्याची घटना घडली होती. पथकाने ती आग विझवली.  

अग्निशामक दलाच्या पथकांनी जाऊन केले मदत कार्य 

आग आणि झाडपडी घटनांची माहिती मिळताच पिंपरी,  थेरगाव,  चिखली,  तळवडे येथील अग्निशामक दलाच्या पथकांनी जाऊन मदत कार्य केले.  त्यामध्ये किरण निकाळजे,  सारंग मंगळूरकर, सूरज पुंडे अंकुश बडे,  शाहू व्हनमाने, भूषण येवले या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी काम केले.

लोणावळा शहरामध्ये यावर्षीच्या सर्वाधिक पाऊस 

लोणावळा शहरामध्ये दीड महिन्यामधील मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे  शहरात तब्बल २७५  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नांगरगाव आदर्श सोसायटी समोरील रस्ता, शहाणी हॉलिडे होम समोरील रस्ता, नारायणी धाम समोरील रस्ता, बापदेव मंदिरासमोरील वलवण गावाकडे जाणारा रस्ता, वलवण नांगरगाव रस्ता, बाजारभागातील रस्ते अशा अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. इंद्रायणी नदीच्या पाणीपात्रात देखील मोठी वाढ झाली आहे.

निगडीत भलेमोठे झाड उन्मळून पडले

 गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु असल्याने निगडी परिसरातील भलेमोठे झाड उन्मळून पडले. हे झाड निगडी बस स्थानकाच्या मागील बाजूस दुचाकी व चारचाकी वाहणाच्या पार्किंग मध्ये असल्याने पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या सुमारे चार फोर व्हीलर वाहनांचा मोठे नुकसान झाले. त्या वाहनात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

Web Title: Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval Incidents of falling trees damage to vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.