PMPML: पुणे, पिंपरीत पाऊस पडला जोमात; पण पीएमपीएमएल गेली कोमात
By तेजस टवलारकर | Published: July 20, 2022 12:53 PM2022-07-20T12:53:46+5:302022-07-20T12:56:30+5:30
पावसामुळे पीएमपीएमएलच्या दिवसाला सरासरी ३०० बस फेऱ्या रद्द
पिंपरी : पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरात मागील आठवडाभर पाऊस झाला. दोन्ही शहरातील जनजीवनावर पावसाचा परिणाम झाला. आठवडाभर झालेल्या पावसाचा फटका प्रवाशांबरोबरच पीएमपीएमएलला बसला. पावसामुळे पीएमपीएमएलला दिवसाला सरासरी ३०० बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. म्हणजेच मागील आठवड्यात २,१०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या बस फेऱ्या, सततच्या पावसाने कमी झालेली प्रवासी संख्या याचा आर्थिक फटका पीएमपीएमएलला बसला.
पावसामुळे मागील आठवड्यात दिवसाला सरासरी ५० ते ६० हजारांनी प्रवासी संख्या कमी झाली होती. परिणामी दैनंदिन उत्पन्न १० ते १२ लाखांनी कमी झाल्याचा पीएमपीएमएल प्रशासनाचा अंदाज आहे. आता रविवारपासून पाऊस कमी झाला आहे. परिणामी बस फेऱ्या पूर्वरत होत असून, प्रवासी संख्यादेखील वाढली आहे, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली.
पुणे, पिंपरी - चिंचवड शहर आणि परिसरात पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसाला सरासरी ११ ते १३ लाख प्रवासी पीएमपीएमएलने प्रवास करतात. तसेच दिवसाला १८ ते १९ हजार बस फेऱ्या होत असतात. परंतु मागील आठवड्यात पाऊस झाल्याने बसचे वेळापत्रक कोलमडले होते. तसेच अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या होत्या. याचा फटका प्रवाशांना देखील बसला.
पीएमपीएमएलची सद्यस्थिती
दैनंदिन होणाऱ्या फेऱ्या : १८ ते १९ हजार
दैनंदिन धावणाऱ्या बस : १,५४०
दैनंदिन प्रवासी संख्या : १० ते १२ लाख
दैनंदिन उत्पन्न : १.२५ ते १.५० कोटी
मागील आठवड्यात असा बसला पावसाचा फटका
दैनंदिन नुकसान : १२ ते १३ लाख
घटलेली प्रवासी : ५० ते ६० हजार
दिवसाला रद्द झालेल्या फेऱ्या : ३००
प्रवासी संख्या आणि दैनंदिन उत्पन्नदेखील घटले
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे दिवसाला होणाऱ्या फेऱ्यांपैकी काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी प्रवासी संख्या घटली आणि दैनंदिन उत्पन्नदेखील घटले. रविवारपासून पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे आता फेऱ्या पूर्वीप्रमाणे होत आहेत. - दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी