पिंपरी-चिंचवडसह मावळ, मुळशी अन् खेडमध्ये धुवांधार पाऊस; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 09:28 PM2021-07-23T21:28:46+5:302021-07-23T21:29:17+5:30
पवना, मुळा आणि इंद्रायणी ओसंडून वाहत असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज...
पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडसह मावळ, मुळशी आणि खेड परिसरात मुसळधार पाऊस पडत असून सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने नागरिकांना झोडपून काढले आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी ओसंडून वाहत आहेत. पवना धरणातून विसर्ग केला नसतानाही नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे. क्षेत्रीय स्तरावर गस्ती पथक तैनात ठेवले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात संततधार सुरू आहे. रविवारपासून पावसाला सुरूवात झाली. मात्र, गुरूवार आणि शुक्रवार या दोन दिवसात संततधार सुरू आहे. तसेच मुळशी आणि खेड, मावळातही सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील नदया ओसंडून वाहत आहेत.
..............
पाणी पातळी वाढतेय
पावसाचा जोर वाढल्याने पवना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. पवना धरणातून विसर्ग केला नसतानाही यंदा पहिल्यांद्याच पावसाच्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदीरात गुरूवारी पाणी शिरले होते. मंदिराचा अर्धा भाग पाण्यात बुडाला होता. आज पाणी काहीसे कमी होते.
............
महापालिकेच्या वतीने पाहणी
शहरातील रावेत, किवळे, चिंचवड, पिंपरी, पिंपळेनिलखसह नदीकाठच्या भागाची पाहणी प्रशासनाने केली. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केले नाही. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास महापालिकेने नदी काठच्या नागरिकांच्या स्थलांतरणाची महापालिकेने सोय केली आहे. पिंपरी, फुलेनगरमधील नागरिकांनी स्थलांतरिक करण्याची मागणी केली होती. परंतु, नाल्याचे पाणी वाढले नसल्याने त्यांना स्थलांतरित केले नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.
..........................................
पिंपरी-चिंचवड शहरात दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पाणी कोठेही साचून राहिले नाही. नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची आत्तापर्यंत वेळ आली नाही. परंतु, पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास आणि नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आल्यास महापालिकेने तयारी केली आहे.
-विकास ढाकणे , अतिरिक्त आयुक्त
.............................
बोटी, जॅकेट सज्ज
महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने सज्जता केली आहे. शाळांची साफसफाई करुन ठेवली आहे. वीज गेल्यास जनरेटरचीही व्यवस्था केली आहे. पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास नदीकाठच्या नागरिकांना उद्या, परवा स्थलांतरित करण्याची वेळ येवू शकेल. महापालिकेचा पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. बोटी, जॅकेट सज्ज ठेवल्या आहेत. आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ढाकणे यांनी सांगितले.
......................
पवना धरण परिसरात दिवसभर पाऊस पडत आहे. सकाळपासून आत्तापर्यंत ३९ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दोन टक्क्यांनी पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
-अन्वर तांबोळी , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पवना धरण