भूमकर चौक भुयारी मार्गात कंटेनर अडकला : हिंजवडी आयटी पार्कचा रस्ता पुन्हा जाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:18 AM2018-08-23T11:18:32+5:302018-08-23T11:19:16+5:30
आयटी नगरी हिंजवडीकडे जाणारया मुख्य रस्त्यातील भूमकर चौक भुयारी मार्गात महाकाय कंटेनर अडकल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे.
पिंपरी- चिंचवड (वाकड) : आयटी नगरी हिंजवडीकडे जाणारया मुख्य रस्त्यातील भूमकर चौक भुयारी मार्गात महाकाय कंटेनर अडकल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे.
गुरुवारी सकाळी मुंबईहून आलेला एनएल ०२, एन ४८९५ ह्या क्रमांकाचा अठरा चाकी महाकाय कंटेनर चिंचवडच्या दिशेला जात असताना भुयारी मार्गात अडकला आहे. या प्रकारामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सकाळी कंपनीत जाण्याच्या गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला घेण्याचे शर्तीचे प्रयत्न सूरु असतानाच या कंटेनरवरील लोखंडी जॉब घसरल्याने तो बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी पोलीसांनी २२ टन महाक्रेनला पाचारण केले असून वाहतूक पोलिसांसह सर्वांचीच धावपळ उडाली आहे. मंगळवारी (दि २१) विनोदे नगर येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तब्बल सहा तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असताना गुरुवारी पुन्हा सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.