दु:खाच्या डोंगराला मदतीची झालर
By Admin | Published: March 28, 2017 02:31 AM2017-03-28T02:31:15+5:302017-03-28T02:31:15+5:30
येलघोल (ता. मावळ) गावातील एका विवाहित तरुणाच्या निधनाची बातमी वाचून रोटरी क्लब
वडगाव मावळ : येलघोल (ता. मावळ) गावातील एका विवाहित तरुणाच्या निधनाची बातमी वाचून रोटरी क्लब आॅफ तळेगाव सिटीच्या सभासदांनी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि मदतीचा हात दिला.
ग्रामीण भागातील येलघोलमध्ये गवताने शाकारलेल्या झोपडीत वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन लहान मुलांसह अशोक घारे हा तरुण राहत होता. त्याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गाव हळहळत होते. रणरणत्या उन्हात तुटपुंजी सावली देणाऱ्या त्या झोपडीच्या पडवीत गावकरी त्या अभागी तरुणाची कहाणी सांगत होते. मोलमजुरी करून पडेल ते काम स्वीकारून हा तरुण प्रपंच चालवीत होता. आपल्या दोन लहान मुलांना चांगले शिकवून मोठे करण्याचे त्याचे स्वप्न होते. गावच्या ढोल पथकातील एक उत्कृष्ट ढोलवादक, उत्तम चित्रकारी करणारा आणि प्रचंड कष्टाळू असणाऱ्या त्या तरुणाने नुकतेच छोटेसे घरकुल बांधायला काढले होते. भिंती उभारल्या गेल्या होत्या. आता फक्त छप्पर आणि फरशी बसवणेच बाकी होते. पावसाळ्यापूर्वी झोपडीतून नव्या घरात राहायला जाण्याचे स्वप्न आकाराला येत होते. पण नियतीला ते मंजूर नसावे. आता गावकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी त्या घरकुलाला छप्पर मिळणे कसे आवश्यक आहे.रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य दादासाहेब उऱ्हे यांनी दोन्ही मुलांचा शालेय शिक्षणाचा खर्च वैयक्तिकरीत्या करण्याचा मनोदय व्यक्त केला. क्लबतर्फे वर्षभराचे किराणा सामान सदर कुटुंबाला देण्याचे अध्यक्ष विलास काळोखे यांनी जाहीर केले. उपाध्यक्ष शशिकांत हळदे यांनी त्या तरुणाच्या वडिलांना आपल्या कंपनीत काम देण्याचे आश्वासन दिले. डॉ. शाळिग्राम भंडारी यांनीदेखील कुटुंबाला वैयक्तिक मदत दिली. मनोज ढमाले यांनी कुटुंबाला रोज दूध पोहचवण्याची व्यवस्था करण्याचे जाहीर केले. रोटरी क्लबचे मच्छिंद्र टिळे, दिलीप पारेख, मनोज ढमाले, बाळासाहेब रिकामे, सुरेश दाभाडे, नरेंद्र ओसवाल, राजेश गाडेपाटील हे उपस्थित होते. (वार्ताहर)