पिंपरी महापालिकेच्या समन्वयातून चाळीस हजार लोकांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 09:00 PM2020-04-13T21:00:30+5:302020-04-13T21:00:45+5:30
लॉकडाऊन काळात बेघर, अनाथ, हातमजूर, दिव्यांग, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न ऐरणीवर
पिंपरी : लॉकडाऊनच्या काळात शहरातील विविध भागात असणाऱ्या भुकेल्यांना अन्नदान करण्यासाठी अनेक संघटनांचे हात पुढे येत असून, या संघटनांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समन्वयातून आज शहरात विविध ठिकाणी सुमारे ३९, १२५ व्यक्तींना अन्न वाटप केले आहे.
कोरोना विषाणूंचा फैलाव वाढू नये यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बेघर, अनाथ, हातमजूर, दिव्यांग, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न ऐरणीवर आला. एकीकडे कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच उपासमार होणाºया लोकांचा प्रश्नदेखील मार्गी लागावा यासाठी स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यांनी या कार्यात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले होते. या आवाहनाला अनेक संस्थानी प्रतिसाद देत गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम केले आहे.
शहरातील विविध भागात जाऊन फूड पॅकेट आणि अन्न वाटप करण्याचा दैनंदिन कार्यक्रम या संस्थेतील कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे. लॉकडाऊन कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहोचविण्यासाठी महापालिकेने विशेष समन्वय कक्ष स्थापन केला आहे. विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि व्यक्तींचे जाळे उभे करून अन्न वाटपाचे नियोजन आणि व्यवस्थापन केले आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त संदीप खोत यांच्या नियंत्रणाखाली कामकाज सुरू असून, या कामात कार्यकारी अभियंत्यांच्या अधिपत्याखाली क्षेत्रीय पातळीवर आठ विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. अन्न व शिधा वाटप करताना सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी
स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
------------------
या संस्थांचा आहे सहभाग....
या कार्यामध्ये विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, लक्ष्य फाउंडेशन, राकेश वाकोर्डे फाउंडेशन,समप्रिय, पीसीसीएफ, पोलीस मित्र नागरिक संघटना, अग्रसेन संघटना, शिवभोजन, संस्कार सोशल फाउंडेशन, धर्म विकास संस्था, काळभैरवनाथ उत्सव समिती, जनकल्याण समिती आदी संस्था सहभागी झाल्या आहेत. तसेच महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातही जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.