गरीब, गरजूंना मदत हीच खरी ईश्वर सेवा- अण्णा हजारे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 03:42 AM2018-08-24T03:42:04+5:302018-08-24T03:42:21+5:30
जैन कॉन्फरन्सतर्फे गरीब रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर
पिंपरी : खरा आनंद मिळवण्यासाठी माणूस सर्वत्र फिरत आहे. परंतु खरा आनंद आपल्या मध्येच लपलेला आहे. माणसातच ईश्वराचे अस्तित्व आहे. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांनी केले.
आॅल इंडिया स्थानकवासी जैन कॉन्फरन्स अंतर्गत गुरू आनंद-कुंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या भोसरी येथील पूजा हॉस्पिटलमध्ये आर. के. लुंकड डायलिसिस सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
पोलीस महासंचालक कृष्णा प्रकाश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुवालाल शिंगवी, उद्योजक प्रकाश रसिकलाल धारिवाल, युवा संघटक पारस मोदी, आमदार महेश लांडगे, जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, माजी अध्यक्ष अविनाश चोरडिया, विजयकांत कोठारी, महिला अध्यक्ष प्रा. रुचिरा सुराणा, युवा अध्यक्ष शशिकांत कर्नावट, उद्योजक राजेश सांखला, पुणे मर्चंट अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माजी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, प्रा. अशोक पगारिया आदी या वेळी उपस्थित होते.
डायलिसिस सेंटरच्या प्रकल्पाचे प्रमुख उद्योजक रमनलाल लुंकड, डॉ. जवाहर भळगट यांनी आपली भूमिका मांडली, गौतम लब्धी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किरण बोरा यांनी गरीब रुग्णांसाठी १०० डायलिसिसच्या खर्चाची अनोखी भेट समाजाला दिली. नगरसेवक संतोष लोंढे यांनी २७ हजार रुपयांची प्रथम मितीची धनराशी देण्याचा मान मिळविला. सागर सांखला यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र लुंकड यांनी आभार मानले.
आपण जनसेवा ही ईश्वर सेवा समजून काम केले पाहिजे. त्यातून मिळणारा आनंद हा खरा असतो. कस्तुरीमृगा प्रमाणे आपण धावत आहोत. हे माझे, हे माझे हे करण्यातच आयुष्य खर्ची होते. आता तर हे माझे, तुझे ते माझे ही कुप्रवृत्ती वाढत आहे. हे असे जगतात की कधी मरणारच नाही. भगवान महावीरांनी सांगितलेला परोपकार हा जैन समाज अंगीकार करीत आहे. त्यामुळेच गुरू आनंद-कुंदन चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या संस्थेच्या कार्यापाठी उभे राहावे.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक