जडीबुटी विक्री व्यवसायाला घरघर.... उदर निर्वाहासाठी मेंढीपालनाचा जोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 08:21 PM2018-07-03T20:21:50+5:302018-07-03T20:33:16+5:30

आरोग्य क्षेत्रात पारंपरिक वारसा हक्काने काम करणाऱ्या जडीबुटीची औषधे देणाऱ्या वैद्यराजांवर मात्र व्यवसाय सोडण्याची वेळ आली आहे.

Herbal breeding business in loss and Wheezing Sheep doing for living role of support | जडीबुटी विक्री व्यवसायाला घरघर.... उदर निर्वाहासाठी मेंढीपालनाचा जोड 

जडीबुटी विक्री व्यवसायाला घरघर.... उदर निर्वाहासाठी मेंढीपालनाचा जोड 

Next
ठळक मुद्देराजस्थानातील चित्तोडिया परिवाराने शोधला पर्यायया ओढाताणीच्या जीवनात विरंगुळा म्हणून करमणुकीसाठी कधी कधी एडक्यांची झुंज

शशिकांत जाधव
तळवडे : सध्या माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. मानव तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्वच क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करत आहे. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रही याला अपवाद नाही. तंत्रज्ञानामुळे उद्योग, व्यवसाय यामध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलल्याने जुन्या क्लृप्त्या, संकल्पना आणि पद्धतीमागे पडत आहेत. यामुळे काही उद्योग, व्यवसाय कालबाह्य ठरत आहेत. राजस्थानातील चित्तोडिया परिवाराचा जडीबुटी विक्रीचा व्यवसाय आहे.
देशभर भ्रमंती करून हा व्यवसाय या परिवाराकडून पिढ्यानपिढ्या करण्यात येत आहे. मात्र, सध्या या व्यवसायाला घरघर लागल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी या परिवाराने मेंढी पालनाचा जोडधंदा सुरू केला आहे. या परिवाराने सध्या तळवडे परिसरात पाल मांडून मुक्काम ठोकला आहे.
घरंदाजपणे जडीबुटी औषधे विक्रीचा व्यवसाय करणारा मूळचा राजस्थान येथील असलेला चित्तोडिया परिवार. या परिवारातील शांतीबाई चित्तोडिया यांनी नव्वदी गाठलेली आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शिक्षण, खरेदी, विक्री, आरोग्य या क्षेत्रांतही आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर आजाराचे निदान आणि त्यावरील उपचार यामध्ये गतिमानता आली. वैद्यकीय क्षेत्रात सर्वांत जास्त प्रगती झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे आरोग्य क्षेत्रात पारंपरिक वारसा हक्काने काम करणाऱ्या जडीबुटीची औषधे देणाऱ्या वैद्यराजांवर मात्र व्यवसाय सोडण्याची वेळ आली आहे.
गावोगावी पाल उभारून मजल-दरमजल करत संपूर्ण भारतभर फिरून विविध आजारांवर, रोगावर जडीबुटीचे रामबाण औषध देऊन रुग्णांना आजारापासून मुक्त करण्याचे काम करणाऱ्या वैद्यराजांच्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घरघर लागली आहे. आधुनिक काळात आजार आणि उपचार क्षेत्रात गरुडझेप घेत मानवाने प्रगती केली. उपचार पद्धतीत झालेले बदल, चौकाचौकांमध्ये थाटलेले दवाखाने, तत्परतेने मिळणारी सेवा यामुळे रुग्णांची विश्वासार्हता वाढली. सहज उपलब्ध होणारी औषधे, आॅनलाइन मिळणारी माहिती यामुळे वारसा पद्धती काम करणाऱ्या वैद्यांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या रोडावत गेली आणि या व्यवसायात काम करणाऱ्या वैद्यराजांना इतर पर्यायी व्यवसाय स्वीकारण्याची वेळ आली आहे. परंतु, यावेळेस त्यांनी मुलांना जडीबुटीचा व्यवसाय करता करता इतर काही तरी करता येते का याचा धांडोळा घेण्याचा सल्ला मुले काल्त्यासिंग आणि पिंटुसिंग यांना दिला आणि नवा व्यवसाय शोधला. 
...............


काळाच्या ओघात जडीबुटीचा व्यवसाय मागे पडत असल्याने चार ते पाच वर्षांपासून तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथून टकरीचा मेंढा अर्थात एडका विकत घ्यायचा. त्याचा सांभाळ करायचा आणि तो धष्टपुष्ट झाला की, त्याची विक्री करायची असा जोडधंदा या कुटुंबाने सुरू केला आहे. कुर्बानीसाठी या एडक्यांना जास्त मागणी असते, असे या कुटुंबीयांकडून सांगण्यात येते. यातून मिळणाऱ्या नफ्यावरच या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याची कसरत सध्या त्यांना करावी लागत आहे. पारंपरिक व्यवसाय गटांगळ्या खात असतानाही नवीन जोडधंदा स्वीकारून पुन्हा जीवनाला उभारी देत हे कुटुंब उभे राहिले आहे. या ओढाताणीच्या जीवनात विरंगुळा म्हणून करमणुकीसाठी कधी कधी एडक्यांची झुंज लावली जाते. यावेळी कुटुंबातील महिला, लहान मुले आणि पुरूष सर्वच जण याचा मनमुराद आनंद घेतात.     
- शांतीबाई चित्तोडिया

Web Title: Herbal breeding business in loss and Wheezing Sheep doing for living role of support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.