महापालिका राबविणार ‘हेरिटेज वॉक’, चिंचवडला नवा लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:11 AM2018-12-23T01:11:19+5:302018-12-23T01:11:58+5:30
चिंचवडगावात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
पिंपरी : चिंचवडगावात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘हेरिटेज वॉक’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे पाच किलोमीटरच्या क्षेत्रात विशिष्ट प्रकारच्या दगडाचा वापर करून बांधलेला रस्ता, रस्त्यालगत दगडी बेंच, यासह मोरया गोसावी यांच्या इतिहासाची लघुचित्रफित, परिसरातील मंदिरांच्या माहितीचे सचित्र फलक यांचा समावेश असल्याने चिंचवडगावला पुरातन ‘लूक’ येणार आहे.
चिंचवडगावात महासाधू मोरया गोवासी यांचे समाधी मंदिर तसेच चापेकर बंधूंचे स्मारक व चापेकर वाड्यामुळे ऐतिहासिक महत्त्व आहे. अशा या चिंचवडगावात आता ‘हेरिटेज वॉक’ हा प्रकल्प साकारला जाणार असून, याबाबत शहरवासीयांना उत्सुकता आहे. या प्रकल्पात चापेकर चौकापासून गुरुकुलमपर्यंतचा रस्ता, केशवनगर ते काळेवाडीपर्यंतचा रस्ता, चिंचवड गावठाण असा पाच किलोमीटर परिसराचा समावेश आहे. सुरुवातीला सुमारे ६० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.
पेबल स्टोनचा रस्ता, ‘लाईट अन् साउंड शो’
वाहने वेगाने जाऊ नयेत यासाठी ब्लॅक बसल्टचा वापर करून पेबल स्टोनचा रस्ता बनविण्यात येणार आहे. यासह चापेकर चौकात ‘हेरिटेज रूट’ दाखविणारा नकाशा उभारण्यात येणार आहे. तसेच या मार्गावरील मंदिर, ऐतिहासिक ठिकाणे, नदीघाट, उद्यान यांची माहिती देणारे विशिष्ट प्रकारचे फलकही ठिकठिकाणी उभारण्यात येणार आहेत. यासह गावातील जुन्या जलवाहिन्या, वीजवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या बदलण्यात येणार असून, नवीन वाहिन्या टाकण्यात येणार आहे. हा प्रकल्प लखनौ, आग्रा या शहरांच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. तसेच परिसरातील सर्व दुकानांना एकसारखे नामफलक लावण्यात येणार असून, जिजाऊ उद्यानाच्या पुढील भागात ‘लाइट आणि साउंड शो’ उभारण्यात येणार आहे. पवना नदीवर थेरगाव आणि चिंचवडच्या बाजूने गोलाकार पद्धतीचा पूल बांधण्यात येणार आहे.
हेरिटेज प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. या प्रकल्पातून चिंचवडगावाला पुरातन लूक देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पातून चिंचवडगावचे ऐतिहासिक महत्त्व आणखी अधोरेखित केले जाणार असल्याने बाहेरील पर्यटकदेखील शहराकडे आकर्षित होतील.
- चंद्रशेखर धानोरकर, उपअभियंता, महापालिका