दुकानाच्या मागच्या दाराने सुरु होती छुपी विक्री ; १५ दुकानदारांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:21 PM2020-03-24T16:21:35+5:302020-03-24T16:25:14+5:30
अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांना वगळून इतर सेवा व दुकाने बंद करण्याचा आदेश आहे. असे असतानाही काही जणांनी त्यांची दुकाने सुरूच ठेवली. अशा १५ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
पिंपरी : अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांना वगळून इतर सेवा व दुकाने बंद करण्याचा आदेश आहे. असे असतानाही काही जणांनी त्यांची दुकाने सुरूच ठेवली. अशा १५ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. दुकानाचे पुढचे दार बंद करून मागच्या दाराने छुप्या पद्धतीने विक्री करणा-या करणा-या दुकानदारांचाही यात समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कलम १४४ नुसार जमावबंदी तसेच संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र काही जणांकडून या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत आहे. अशा नारिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. काही व्यावसायिकांनी दुकाने पुढचे दार बंद करून मागच्या दाराने विक्री सुरू ठेवली आहे. अशा छुप्या पद्धतीने विक्री करणा-या दुकानदारांवरही पोलीस कारवाई करीत आहेत. दाटवस्तीच्या भागात असे प्रकार सर्रास सुरू आहेत. अशा भागात पोलिसांकडून पाहणी करण्यात येत आहे.
- दुकानदारांवर पोलीस ठाणेनिहाय झालेली कारवाई
पिंपरी - १
भोसरी - ५
वाकड - ४
सांगवी - २
चिखली - १
देहूरोड - २
एकूण - १५