लष्कर सेवा उच्च दर्जाची
By admin | Published: May 7, 2017 03:10 AM2017-05-07T03:10:31+5:302017-05-07T03:12:23+5:30
देशातील इतर प्रशासकीय सेवांपेक्षा लष्कर सेवा उच्च दर्जाची आहे. त्यामुळे लष्करातील सेवेकडे विशेष सेवा म्हणून पाहिले पाहिजे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील इतर प्रशासकीय सेवांपेक्षा लष्कर सेवा उच्च दर्जाची आहे. त्यामुळे लष्करातील सेवेकडे विशेष सेवा म्हणून पाहिले पाहिजे. प्रशासकीय सेवेतील पदोन्नतीचे नियम लष्कर सेवेसाठी लावणे योग्य होणार नाही.त्यातून आपण स्वत:च आपला दर्जा कमी करून घेतल्या सारखे होईल,असे देशाचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी शनिवारी सांगितले.
वॉर वाउंडेड फाऊंडेशनच्या वतीने आर्म फोर्स मेडिकल कॉलेज (एएफएमसी) येथे आयोजित दिव्यांग सैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बिपिन रावत बोलत होते. कार्यक्रमास फाऊंडेशनचे अध्यक्ष निवृत्त ले.जनरल विजय ओबेरॉय, सदन कमांडचे ले.जनरल पीएम हॅरिझ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
रावत म्हणाले, केंद्र शासनाकडून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीस सुरूवात केली आहे. त्यात लष्कर सेवतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील काही विसंगती सोडविण्यात आल्या आहेत. तर उर्वरित विसंगती भविष्य काळात सोडविल्या जातील. सातव्या वेतन आयोगानुसार जवान आणि अधिका-यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली असून जवानाचे वेतन 5 हजार 200 आणि अधिका-यांच्या वेतनात 15 हजार 500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे जानेवारी 2016 पासूनचा फरक दिला जाणार आहे.
दरम्यान, देश सेवेसाठी दिलेल्या जवानांप्रती बिपिन रावत यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या रॅलीमध्ये विविध राज्यातून आलेल्ये जवान सहभागी झाले होते. त्यात पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्र, अपंग पूनर्वसन केंद्र आणि क्विन मेरिज टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या जवानांचा सहभाग होता.