‘हिल स्टेशन’ लोणावळा विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:28 AM2018-09-28T01:28:42+5:302018-09-28T01:28:55+5:30

ब्रिटिश काळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले लोणावळा शहर स्वातंत्र्यानंतरच्या काळात पर्यटन विकासापासून वंचित राहिले आहे.

'Hill Station' Lonavala deprived of development | ‘हिल स्टेशन’ लोणावळा विकासापासून वंचित

‘हिल स्टेशन’ लोणावळा विकासापासून वंचित

googlenewsNext

लोणावळा  - ब्रिटिश काळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले लोणावळा शहर स्वातंत्र्यानंतरच्या काळात पर्यटन विकासापासून वंचित राहिले आहे. पर्यटननगरी अशी जगभरात ओळख असली तरी येथील पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता शासनाकडून कोणतेही अपेक्षित प्रयत्न झालेले नाहीत. गेल्या साडेतीन- चार वर्षांपासून या शहराच्या पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. लोणावळा व परिसराचा पर्यटन विकास आराखडा देखील तयार करत मान्यतेकरिता पाठविण्यात आला असून, निधीची प्रतिक्षा आहे.
लोणावळा नगर परिषदेची १८७७ साली स्थापना झाली. त्यानंतरच्या काळात शासनाकडून नगर परिषदेला गिरिस्थान म्हणून घोषित करण्यात आले. लोणावळ्यात गिरिस्थानाचे नियम लावण्यात आले. मात्र नियोजना अभावी शहर बकाल झाले आहे. नागरीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची तोड झाल्याने येथील थंड वातावरण गरम होऊ लागले. थंड हवेचे ठिकाण ही ओळख हरवू लागली आहे. यामुळे बारमाही पर्यटनाचे ठिकाण असलेले लोणावळा केवळ पावसाळी पर्यटनाचे केंद्र बनले आहे.
महत्त्वकांक्षी प्रकल्प अधांतरीच
खरेतर लोणावळा व खंडाळा शहराचा निसर्गरम्य परिसर, हिरव्यागार डोंगररांगा, त्यामधून वाहणारे धबधबे, सकाळी व सायंकाळी डोंगरकपारीतील धुक्याची लवलाही असा हा सर्व निर्सगरम्य परिसर मनाला हवाहवासा वाटावा असा आहे. लोणावळ्याच्या आजूबाजूला असणारे गड किल्ले व लेण्या येथील इतिहास व प्राचीनतेची साक्ष देतात. मुंबई-पुणे या शहराच्या मध्यावर असलेले लोणावळा पर्यटकांना भुरळ घालणारे पर्यटनस्थळ आहे. या शहराचा पर्यटनात्मक दृष्ट्या विकास करण्याकरिता शासनाने विविध उपक्रम राबविणे, विशेष निधीची तरतूद करणे अपेक्षित असताना यापैकी काहीच न झाल्याने आज लोणावळ्याच्या सौंदर्यात भर घालणारे तसेच पर्यटन विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प अधांतरीच आहेत.
लोणावळा नगर परिषदेची मालकी जागा असलेल्या तुंगार्ली धरणालगत मनोरंजन नगरी उभारणे, खंडाळा व्हॅलीत रोप वे प्रकल्प व पर्यटन सुविधा केंद्र उभारणे, बोटिंग क्लब हे सर्व प्रकल्प केवळ निधीच्या अभावी रखडलेले आहे. एकीकडे लोणावळ्यातील बांधकामे व इतर बाबींकडे गिरिस्थानाच्या नियमावलीतून पाहिले जात असताना दुसरीकडे गिरिस्थानांच्या कोणत्याही योजना वा निधी देण्यात येत नसल्याने लोणावळा पर्यटन विकासापासून वंचित आहे.
लोणावळा- खंडाळा ही शहरे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. या शहरांच्या सोबत आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा पर्यटनात्मक विकास साधण्याच्या दृष्टीने लोणावळ्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा मंजूर झाल्यानंतर राज्य व केंद्र शासनाच्या भरीव निधीतून या सर्व भागात मोठ्या प्रमाणात पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे मावळ तालुक्याचे आमदार संजय भेगडे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील वातावरण व हिरवागार निर्सग, डोंगरदऱ्या, गड किल्ले, धरणे हा सर्व परिसर पर्यटकांना साद घालत आहे. ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीवर विशेष भर दिल्याने यावर्षी ग्रामीण भागातील पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लोणावळ्या प्रमाणे पवन व आंदर मावळात पर्यटकांची संख्या वाढल्याने कृषी पर्यटन, वन पर्यटन, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास प्रकल्प, घरगुती खाणावळी या माध्यमातून खेडेगावात मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची साधने तयार झाली आहेत. येणाºया काळात केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या भरीव निधीतून लोणावळा व मावळातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. - बाळा भेगडे, आमदार, मावळ

Web Title: 'Hill Station' Lonavala deprived of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.