हिंदू-मुस्लिमांनी एकमेकांना समजून घ्यावे - आ. ह. साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 02:09 AM2019-01-06T02:09:22+5:302019-01-06T02:10:02+5:30

आ. ह. साळुंखे : मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Hindus and Muslims should understand each other - Salunkhe | हिंदू-मुस्लिमांनी एकमेकांना समजून घ्यावे - आ. ह. साळुंखे

हिंदू-मुस्लिमांनी एकमेकांना समजून घ्यावे - आ. ह. साळुंखे

Next

पुणे : ‘भारतीय समाज संमिश्र स्वरूपाचा आहे. हिंदू - मुस्लिम समाजामध्ये हजारो वर्षांचा संपर्क आहे. यामध्ये कटुता, युद्ध, संघर्ष, वादळ आहे; त्याचप्रमाणे, स्नेह, मैत्री, जिव्हाळ्याचाही संपर्क आहे. भूतकाळातून काय शिकायचे, भावी पिढ्यांना काय वारसा द्यायचा, हे ठरवणे ही आपली जबाबदारी आहे. आजवर एकमेकांना समजून घेण्यात हिंदू - मुस्लिम समाज कमी पडले, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केली. धर्माधर्मात, जाती-जातीत दुरावा निर्माण होत आहे, ही चिंतेची बाब आहे. स्नेहाच्या मार्गानेच पुढे जावे लागेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आयोजित मुस्लिम मराठी साहित्य चळवळीच्या १२ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, संमेलनाध्यक्ष डॉ. अलीम वकील, स्वागताध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, डॉ. विश्वनाथ कराड, महापौर मुक्ता टिळक, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, विलास सोनवणे, डॉ. एस. एन. पठाण, निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल निजाम नदाफ, प्रा. फ. म. शहाजिंदे, आबेदा इनामदार, लतीफ मगदूम, सय्यदभाई, डॉ. सलीम चिश्ती, अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात डॉ. विश्वनाथ कराड यांना डॉ. अबुल कलाम आझाद सद्भावना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जुल्फी शेख, डॉ. मुहम्मद आझम, आबेदा इनामदार, विलास सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी ‘काफिला’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
डॉ. साळुंखे म्हणाले, ‘आपण सर्व जण समान दर्जाचे भारतीय नागरिक आहोत. कोणाच्याही देशावरील निष्ठेचे प्रमाणपत्र मागण्या-देण्याचा नैतिक, संवैधानिक अधिकार नाही. कोणीही राष्ट्र विघातक काम करीत असेल तर त्याला रोखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. हजारो वर्षांचा संपर्क असूनही आपण एकमेकांचे ग्रंथ, साहित्य समजून घेतले नाही. एकमेकांच्या साहित्याचा, धर्मग्रंथांचा अभ्यास करणारे पंडित दोन्ही समाजात घडावेत. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘संघटितपणे समाजात संदेश देण्यासाठी, मानव धर्माला उपयुक्त काम या संमेलनातून होत आहे, ही चांगली बाब आहे. समाजातील वाईट गोष्टी उघडकीस आणणे आणि सकारात्मक गोष्टी पुढे आणण्याचे काम संमेलनाने करावे. राजकारण्यांनी सर्व व्यासपीठांवर लुडबुड करू नये, असे मला वाटते.’ डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, ‘प्रस्थापित साहित्यिकांनी नवोदित तरुणांना वाव द्यावा. नव्या तंत्रस्नेही तरुणांनी कालसुसंगत विचार आधुनिक माध्यमातून मांडावेत.’ लतीफ मगदूम यांनी आभार मानले.

‘चला संभ्रमित होऊया’ अशा प्रकारचा आजचा काळ आहे. २०१४ पूर्वीचा असाच इतिहास पंतप्रधान मोदींनी सांगितला. पण, इतिहास डस्टरने पुसता येणार नाही. भाजपा, संघपरिवाराचे स्वातंत्र्य चळवळीतील एकाही महानायकाशी गोत्र जुळत नाही. काँग्रेसमुक्त भारताबरोबर त्यांना मुस्लिममुक्त भारत करायचा आहे. संभ्रमित करणाऱ्या या काळाचा सामना केला पाहिजे.
- डॉ. अलीम वकील, संमेलनाध्यक्ष

Web Title: Hindus and Muslims should understand each other - Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.