Hinjawadi Fire Incident :'बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली अन् ..' चालकाने असा रचला कट
By विश्वास मोरे | Updated: March 20, 2025 20:22 IST2025-03-20T20:19:25+5:302025-03-20T20:22:07+5:30
हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलरला आग प्रकरणी अपघात नव्हे घातपात

Hinjawadi Fire Incident :'बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली अन् ..' चालकाने असा रचला कट
हिंजवडी : हिंजवडीतील ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा बळी गेल्याची घटना बुधवारी घडली होती. चोवीसतासानंतर हा अपघात नव्हे तर घातपात आहे, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दिवाळीचा बोनस आणि मजुरांचे काम सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे गुरुवारी सायंकाळी उघकीस आले आहे. जनार्दन हंबर्डीकर या चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन बुधवारी सकाळी मिनी बस (एमएच १४ सीडब्लू ३५४८) पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाले होते. त्यावेळी बुधवारी सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस अचानक आग लागली. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि सहाजण जखमी झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींची प्रकृती स्थिर आहे.
बेंझिन केमिकल आणले, वारजेतून काडीपेटी घेतली
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी माहिती दिली. त्यात घातपात असल्याचे उघड झाले आहे. विशाल गायकवाड म्हणाले, 'अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आग कशामुळे लागली. याचा तपास सुरु केला. त्यावेळी शॉर्ट सर्किटने आग लागली नसल्याचे आढळून आहे. मग कामगारांशी आणि कंपनीत चौकशी केली त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये बोनस न दिल्याने आणि वेतन कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिली आहे, अशी माहिती उघड झाली आहे. नियोजनबद्द कट रचून त्याने हा प्रकार केला आहे. आरोपीने कंपनीतून आदल्या दिवशी बेंझिन नावाचे केमिकल गाडीत आणून ठेवले. तसेच वारजे येथून काडेपेटी घेतली होती. तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही गाडीतील सीट खाली आणून ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ आल्यावर कंपनी काही अंतरावर असताना त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या, उडी मारली. केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाला.
कशामुळे घडले ?
१) हंबर्डीकर यांचे कंपनीतील त्यांच्या सहकाऱ्यांशी सतत वाद होत होते. दररोजच्या प्रवासातील समस्या आणि सहकारी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संघर्षांमुळे तणाव वाढत असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी केलेल्या तपासात आढळले.
२) हंबर्डीकर याने काडी पेटवून रासायनिक स्फोट घडवून गाडीला आग लावली. स्फोट होण्यापूर्वीच चालक गाडीतून बाहेर उडी मारली होती.
यांचा गेला नाहक बळी
वाहन पेटवून झालेल्या अपघात सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (५८, रा. नऱ्हे), गुरुदास लोकरे (४०, रा. हनुमाननगर, कोथरूड), राजू चव्हाण (४०, वडगाव धायरी) यांचा मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (५२, रा. कोथरूड), विश्वास लक्ष्मण खानविलकर (पुणे), प्रवीण निकम (३८), चंद्रकांत मलजी (५२, रा. दोघेही कात्रज) जखमी झाले. विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदीप बाबुराव राऊत बसमधून सुखरूप बाहेर पडले होते.