हिंजवडी, देहूगावसह आठ गावांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:36 AM2018-02-06T01:36:20+5:302018-02-06T01:36:34+5:30
महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे व देहूगाव- विठ्ठलनगर ही आठ गावे समाविष्ट करण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत आज मंजुरी दिली.
पिंपरी : महापालिकेत हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे व देहूगाव- विठ्ठलनगर ही आठ गावे समाविष्ट करण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत आज मंजुरी दिली. मात्र, १९९७ मध्ये समाविष्ट केलेल्या अठरा गावांनाच अद्याप न्याय देऊ शकलो नाही़ रस्ते, कचरा, आरोग्य आणि पाण्याची समस्या गंभीर आहे, अशातच नवीन सात गावे महापालिकेत समाविष्ट करू नयेत, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.
पिंपरी महापालिकेने पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून ही गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याविषयी सरकारडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती केली होती़ नवी गावे समावेशाचा विषय महापालिका सभेसमोर सोमवारी आलो होता. विषय मंजुरीपूर्वी चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. भाजपातील नगरसेवकांनी आणखी समाविष्ट गावांच्या समावेशाबाबत सकारात्म मते व्यक्त केली, तर राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेतून संमिश्र मते व्यक्त झाली.
दत्ता साने म्हणाले, ‘‘अगोदरच्या समाविष्ट गावांना न्याय मिळाला नाही, मग आणखी गावे कशासाठी घेत आहोत. यास आमचा विरोध आहे. देहू -आळंदीही पूर्णपणे घ्यायला हवीत.’’ पंकज भालेकर म्हणाले, ‘समाविष्ट गावांत पाणी, रस्ते आरोग्य सुविधेची वाणवा आहे. मूलभूत सुविधाही सक्षमपणे पुरवल्या जात नाहीत. मग अट्टाहस कशासाठी?’’
अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘नवीन गावे समाविष्ट करताना यावर प्रशासनाचे म्हणणे काय आहे. त्या गावांतील नागरिकांचे म्हणणे काय आहे, त्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.’’ भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘नवी गावे घेण्याविषयी प्रशासन खेळ तर करीत नाही ना? विश्वस्त म्हणून आपली जबाबदारी आहे, प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे.’’
राहुल कलाटे म्हणाले, ‘‘समाविष्ट गावात आजही पाण्याची समस्या गंभीर आहे. आणखी नवीन गावे घेताना काय नियोजन करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे.’’
>खासदारांनी किती विकासकामे केली ?
समाविष्ट गावातील रस्ते विकासात रिंग झाल्याचा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला होता. आज त्याचे नाव न घेता भाजपा सदस्यांनी जोरदार टीका केली. यासंदर्भात झालेल्या चर्चेत सचिन चिखले, संदीप वाघेरे, रेखा दर्शिले, अश्विनी जाधव, सारिका सस्ते, माई ढोरे, मीनल यादव, राहुल जाधव, विकास डोळस आणि सुवर्णा बुरडे यांनी सहभाग घेतला. भाजपाच्या नगरसेवकांनी समाविष्ट गावांना निधी दिल्याने खासदारांना पोटशूळ झाला आहे. त्यांनी किती विकासकामे केली हे दाखवावे, अशी टीका केली. समाविष्ट गावांच्या विकासासाठी काहीही न करणाºया खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करून निधी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आणि विकासाला खोडा घालणाºया विरोधकांचा समाचारही घेतला.
>नियोजनबद्ध विकास होणार
स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘समाविष्ट गावे महापालिकेत घेतल्यानंतर विकासासाठी वीस वर्षे वाट पहावी लागली. आम्ही समाविष्ट गावांना निधी दिला तर विरोधकांना त्रास होत आहे. नवी गावे महापालिकेत घ्यायची असतील, तर त्यांच्यासाठी आपणास निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. आजपर्यंत फोकस करून कामे होत नव्हती ती आम्ही करीत आहोत.’’ सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शहराचा सर्वांगिण विकास करायचा आहे. जुन्या समाविष्ट गावांचाही विकास सुरू आहे. नवीन गावे आली तर त्यांचाही विकास करू. नियोजन करू. समाविष्ट गावात आम्हाला दुसरे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, आणि वाकड करायचे आहे.’’
>महापालिकेची वाढीव हद्द
पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे, तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीचे नैसर्गिक हद्दीपर्यंतचे देहूगाव- विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र पिंपरी महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा पुनश्च राज्य सरकारकडे हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.