Hinjawadi : हिंजवडीतील इलेक्ट्रॉनिक कंपनी आगीत भस्मसात ; एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 11:43 AM2020-02-18T11:43:54+5:302020-02-18T11:46:06+5:30
Pune News : आग संपूर्ण कंपनीत पसरल्याने कंपनीतील मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
हिंजवडी : आयटीपार्क टप्पा क्रमांक दोन मधील एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक कामगार गंभीर जखमी झाला तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. आयटीनगरी माण हद्दीतील टप्पा क्रमांक दोन मधील व्हरॉक लाइटनींग सिस्टीम प्रा.लि. कंपनीत मंगळवारी (दि.१८) पहाटे तीनच्या सुमारास भिषण आग लागली तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना तसेच ग्रामस्थांना यश आले आहे.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे इलेक्ट्रिक सुटे भाग कंपनीत तयार करण्यात येत होते, प्लास्टिक, रबर मटेरिअल असल्याने आगीने तत्काळ रौद्ररुप धारण केले, काही वेळातच आग संपूर्ण कंपनीत पसरल्याने कंपनीतील मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती पुढे येत आहे. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच आयटीपार्क तसेच पीएमआरडीए विभागाचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनेचेे गांभीर्य ओळखून स्थानिक ग्रामस्थ संदीप ओझरकर, हिरामण गवारे, संतोष ओझरकर, रामदास गवारे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले, जेसीबीच्या सहाय्याने शक्य होईल तेवढे कंपनीतील मटेरिअल सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली तसेच पाण्याचे टँकर घटनास्थळी पाठवत आग विझविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.