हिंजवडी ते घोटावडे रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:26 AM2019-04-02T02:26:57+5:302019-04-02T02:27:20+5:30
घोटावडे : आयटीनगरीस जोडणारे रस्ते असुरक्षित
हिंजवडी : मुळशी तालुक्यातील घोटावडेगाव ते आयटीपार्कला जोडणारा तीन किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित रस्ते ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने कसल्याच उपाययोजना न केल्याने या रस्त्यावर अपघाताला आयते निमंत्रणच मिळत आहे. तीन किलोमीटरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रूंदीकरणासाठी दीड ते दोन फुटापर्यंत खोदकाम केलेले आहे. मातीच्या भरावावरून घसरून अपघात घडत आहेत.
या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक, दिशादर्शक, रिफ्लेक्टर, लाल रिबन अथवा खासकरून रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या लक्षात येईल असे सूचना फलक लावलेले नाहीत. रविवारी दुपारच्या सुमारास खोदकामाचा अंदाज न आल्याने बापूजीबुवा मंदिराच्या मागील बाजूस काही अंतरावर दुचाकी आणि मोटार यांच्यात धडक झाली. दोन्ही वाहने पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडली होती. यामध्ये अक्षय लक्ष्मण खानेकर (वय २३, रा. खांबोली, ता. मुळशी) व त्याचा मित्र हे गंभीर जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाटबंधारे खात्याअंतर्गत मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. मात्र ज्या कंपनीला हे काम दिले जाते त्यांच्याकडून सर्व अटी आणि नियमांची पूर्तता केली जात आहे की नाही हे तपासण्याबाबत पाटबंधारे विभाग उदासीन आहे. ग्रामस्थांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुळशी पाटबंधारे विभागाकडून पिरंगुट ते उर्से असा तब्बल ५५ किलोमीटरचे रस्ता रुंदीकरणाचे काम ‘रोड वे सोल्युशन’ या कंपनीला देण्यात आले आहे. कामाची गुणवत्ता व सुरक्षितता तपासण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र अभियंता नेमण्यात आला आहे. तरीसुद्धा या रस्त्यावरील कामात सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे. वरिष्ठांमार्फत याप्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
ठेकेदार बेफिकीर : खोदकामाचा येत नाही अंदाज
पिरंगुट, उरावडे एमआयडीसी ते हिंजवडी आयटीपार्कला जोडणारा हा एकमेव महत्त्वाचा रस्ता आहे तसेच ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता असल्याने या रस्त्यावर दिवसरात्र मोठी वर्दळ असते. आगोदरच हा रस्ता अरुंद आहे त्यातच रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूला खोदकाम केल्याने याठिकाणाहून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी समोरून वेगाने वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूकडील खोदकामाचा अंदाज न आल्याने हमखास अपघात होतात.