हिंजवडी, वाकडसह पिंपरी शहरात खुलेआम निघतोय 'नशे'चा धूर ; आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुण 'टार्गेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:26 PM2020-10-23T22:26:15+5:302020-10-23T22:26:56+5:30
पानटपरी, झोपडपट्टी भागासह फोनद्वारे घरपोच मिळतोय गांजा..
पिंपरी : एका बाजूला पोलिसांकडून शहरात विक्री होणाऱ्या गांजा तसेच नशेच्या व अमली पदार्थांच्या विक्रीवर कारवाई होत आहे. मात्र, पोलीस कारवाईला न जुमानता हिंजवडी, वाकड, निगडी, पिंपरी, भोसरी, आळंदी व चाकण भागात गांज्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन' मध्ये दिसून आले. वाकड व ताथवडे येथील महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि हिंजवडीतील आयटीयन्स तरुणांना त्यासाठी लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.
हिंजवडीतील मुख्य चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानामागील पानाच्या टपरीतून संबंधित व्यक्तीचा संपर्क नंबर दिला जातो. त्यानंतर वाकड परिसरातील काळाखडक झोपडपट्टी भागातील काही ठिकाणी महिलांच्या माध्यमातून गांजाची विक्री होत आहे. या परिसरातील एका पानटपरीत जाऊन हिरवा माल, पुडी, भमभम भोलेनाथ असे कोडवर्ड सांगायचा. त्यानंतर पानटपरी चालकाकडून झोपडपट्टीतील कोणाशी संपर्क साधावा किंवा घरपोच मिळण्यासाठी काही जणांचे नंबर दिले जातात.
दरम्यान, लोकमत प्रतिनिधीने वाकड भागातील काळाखडक झोपडपट्टी भागात जाऊन शनिवारी सांकेतिक भाषेत पुडी मिळेल असे विचारले. त्यानंतर अगोदर ३०० रुपये सांगून त्यानंतर २०० रुपयांना गांजाची पुडी सहज उपलब्ध झाली. त्यानंतर हिंजवडी भागातील एका पानटपरीवर नीलेश नावाच्या एकाचा मोबाइल नंबर देण्यात आला. या नंबरवर संपर्क केला असता, भैया कितना चाहिऐ बेलो, घरपोच देंगे, असे सांगून पुडीच्या आकारानुसार ५०० ते १००० रुपये सांगितले. पोलिसांची काही अडचण येईल का, असे विचारल्यानंतर काही अडचण नसल्याचे बिनधास्तपणे संबंधित व्यक्तीने सांगितले. हे रेकॉर्डिंग अमली पदार्थ विरोधी पथकाकडे लोकमत प्रतिनिधीने पाठविले आहे.
----------------
वसुली पंटर नामानिराळे
आपल्या पोलीस स्टेशनच्या भागात कोणत्या ठिकाणी गांज्यासारख्या नशेच्या पदार्थांची विक्री होते. याची माहिती संबंधित स्टेशनमधील वसुली पंटर म्हणून जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याकडे असते. अनेकदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व इतर कर्मचारी यांची बदली होते. मात्र वसुली पंटर अनेक वर्षांपासून स्टेशनला तळ ठोकून आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याकडून कारवाईचा फार्स केला जातो. कोणावर कारवाई दाखवायची आणि कोणावर नाही, हे वसुली पंटर ठरवित असल्याची माहिती सूत्राने दिली.
----------------
प्रतिनिधी आणि एजंट यांच्यामधील संवाद
प्रतिनिधी : हॅलो भैय्या पुडी होना था
एजंट : हा मिलेगी ना, कहा पे होना बोलो, तुम जहा बोलेंगे वहा पे लाके दुंगा
प्रतिनिधी : पोलीस की कोई दिक्कत नही आयेंगी ना
एजंट : कोई दिक्कत नही आयेगी, अपना काम प्रायव्हेट है, कोई टपरी थोडी है अपनी
प्रतिनिधी : पैसे कितने देने पडेंगे
एजंट : जितनी बडी पुडी उतने पैसे, ५००, ७००, १००० तक की पुडी मिलेगी.
प्रतिनिधी : ठीक है, मै मेरे दोस्त को पुछके बताता
एजंट : जल्दी बोलो मै अभी पुडी देने जा रहा हू, पैसे कल-परसो दिये तो भी चलेगा अपने पास सब कॉलेज के लडके आते है
हो रेकॉर्डिंग ऐकले. पिंपरी - चिंचवड परिसरात अमली पदार्थ तस्करीवर कारवाई सुरू आहे. ती अधिक प्रभावी केली आहे. त्याच्या समूळ उच्चाटनासाठी पोलीस यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत.
- श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड
---------------------------
शहरात कुठे व कोण आहे एजंट
हिंजवडी : चोरगे, महाडिक
वाकड : नीलेश
ताथवडे : पानटपरी
निगडी : रफीक, पवार
चाकण : स्थानिक नागरिक
---------------------