हिंजवडीत भिंत अंगावर कोसळुन कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:58 PM2018-07-05T18:58:28+5:302018-07-05T18:58:57+5:30
ठेकेदारांनी कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाही शिवाय सुरक्षिततेची योग्य प्रकारे दक्षता घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असा ठेकेदारांवर आरोप करण्यात आला आहे..
पिंपरी : भिंत पाडण्याचे काम सुरु असताना हिंजवडीत अंगावर भिंत कोसळुन गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा बुधवारी(दि. ५ जुलै) रात्री २ च्या सुमारास मृत्यू झाला. अनारूल अल्लाउद्दिन एसके (वय ३७, रा. गंगारामवाडी, हिंजवडी) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इन्फोटेक रिसायकलिंग प्रा. लि. कंपनीचे लेबर ठेकेदार आणि ब्रेकर चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फोटेक रिसायकलिंग प्रा. लि. या कंपनीचे लेबर ठेकेदार हिंजवडी येथील सिरनजी कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंत पाडण्याचे काम बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कामगारांकडून करून घेत होते. हे काम सुरु असताना ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरविली नव्हती. कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश पडेल अशी विद्युत सुविधा नव्हती. काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा रोडा होता, अशा स्थितीत काम करणाऱ्या कामगारांवर तेथे काम करणे जिवावर बेतले. ठेकेदारांनी कामगारांना सुरक्षा साधने पुरवली नाही शिवाय सुरक्षिततेची योग्य प्रकारे दक्षता घेतली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली असा ठेकेदारांवर आरोप करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए. एम. पगारे तपास करत आहेत.