ऐतिहासिक बुद्धविहार वर्धापन दिन : देहूरोडमध्ये अभिवादनासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 01:22 AM2018-12-26T01:22:10+5:302018-12-26T01:22:37+5:30

देहूरोड येथील बुद्धविहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून (ब्रह्मदेश) येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची २५ डिसेंबर १९५४ रोजी स्वहस्ते प्रतिष्ठापना केली.

 Historical Buddha Vihar Anniversary: Range for Greetings in Dehurod | ऐतिहासिक बुद्धविहार वर्धापन दिन : देहूरोडमध्ये अभिवादनासाठी रांगा

ऐतिहासिक बुद्धविहार वर्धापन दिन : देहूरोडमध्ये अभिवादनासाठी रांगा

googlenewsNext

देहूरोड  - येथील बुद्धविहारात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रंगून (ब्रह्मदेश) येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची २५ डिसेंबर १९५४ रोजी स्वहस्ते प्रतिष्ठापना केली. मंगळवारी (ता. २५) त्यास ६४ वर्षे पूर्ण झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ-मुळशीसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक आंबेडकर अनुयायांनी ऐतिहासिक धम्मभूमीतील बुद्धमूर्ती, तसेच डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिस्तूपाचे सकाळपासून रांगा लावून मनोभावे दर्शन घेतले. लोकप्रतिनिधी, तसेच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या अनेक मान्यवरांनीही बुद्धमूर्तीचे दर्शन घेऊन डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. दुपारपर्यंत सुमारे दोनशेहून अधिक भन्ते धम्मभूमीत दाखल झाले होते. देहूरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता; तसेच देहूरोड वाहतूक शाखेने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना केली होती.
वर्धापन दिनी दर्शनासाठी देहूरोड येथील पुणे-मुंबई महामार्ग परिसर, रेल्वे मैदान, लष्करी भाग, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाचा, तसेच बाजारपेठेचा संपूर्ण पश्चिम परिसर आंबेडकरी अनुयायांनी गजबजून गेला होता. दर वर्षीप्रमाणे यंदाही कुटुंबासह या अनुयायांनी धम्मभूमी परिसरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. मंगळवारी पहाटे सहा-साडेसहापासून सुरू झालेली अनुयायांची गर्दी दिवसभर कायम होती. धम्मभूमीवर दर्शनरांग दिवसभर वाढतच होती. ही रांग दुपारी दोनच्या सुमारास महामार्गाच्या समांतर दिशेने लांबपर्यंत गेली होती.
देहूरोडच्या जवळ असलेल्या मावळ-मुळशीसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील तरुणांचे जथ्थे रॅलीद्वारे धम्मभूमीकडे जाताना दिसत होते. नजीकच्या जिल्ह्यासह मावळमधील तरुण रॅली काढून धम्मभूमीवर आले होते. काहींनी दुचाकी रॅली काढली होती.
देहूरोड परिसरात चहूबाजूंनी येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सर्व रस्त्यांवरून येणारे अनुयायी डॉ बाबासाहेबांचा जयघोष करताना दिसत होते. देहू-देहूरोड परिसरातून जाणारे सर्व रस्ते आंबेडकरांच्या अनुयायांनी तुडुंब भरून वाहत होते. देहूरोड पोलिसांनी वाहनांची गर्दी वाढत असल्याने पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी देहूरोड वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूककोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत होती. वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्त नीलिमा जाधव, देहूरोडचे वाहतूक निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाने आठ पोलीस अधिकारी व ४० वाहतूक कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत ठेवली होती.
चौपदरी महामार्ग ओलांडण्यासाठी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. महामार्गाच्या दोन्ही बाजूंजवळील मोकळ्या जागा, तसेच नवीन पुलावर र्पाकिंग करण्याबाबत वाहतूक पोलीस कर्मचारी सहकार्य करीत होते. वाहतुकीला अडथळा ठरणाºया वाहनांना इतरत्र हलवून दर्शनाला येणाºया अनुयायांना रस्ता मोकळा करून देण्यात येत होता. बसव्यतिरिक्त जड वाहनांना दुपारनंतर बंदी घालण्यात आली होती. विविध चौकांत वाहतूक पोलीस ठेवण्यात आले होते. देहूरोड परिसरात चहूबाजूंनी येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सर्व रस्त्यांवरून येणारे अनुयायी डॉ बाबासाहेबांचा जयघोष करताना दिसत होते.

पथनाट्याचे सादरीकरण

यंदाही दरवर्षीप्रमाणे बुद्धविहार कृती समिती, बुद्धविहार ट्रस्ट, धम्मभूमी सुरक्षा समिती, भारतीय बौद्ध महासभा, मावळ प्रबोधिनीचे रवींद्र भेगडे व युवाशक्ती प्रतिष्ठान, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, भारिप बहुजन महासंघ, सोशल एज्युकेशन व मुव्हमेंट पुणे, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन समाज पार्टी, देहूरोड आरपीआय आठवले गट, स्वाभिमानी रिपब्लिक पक्ष, युवारत्न सेवा समिती, एकता महिला मंडळ, बाळासाहेब गायकवाड युवा मंच, बुद्धिष्ट सोसायटी आॅफ इंडिया, भारतीय जनता पार्टी मोर्चा व अमोल नाईकनवरे तसेच विविध सामाजिक संघटना व व्यक्तींच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम, भीमगीते गायन, शिक्षण व करिअर मार्गदर्शन, प्रबोधन सभा तसेच अन्नदान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. समता सैनिक दलाच्या वतीने विहारसमोर पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने स्वागत कक्ष उभारून अनुयायांचे स्वागत करण्यात येत होते. उपाध्यक्ष सारिका नाईकनवरे, काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल यांनी स्वागत केले. बोर्डाच्या वैद्यकीय विभागामार्फत दिवसभर रुग्णवाहिका व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या वेळी बोर्डाचे वैद्यकीय अधिकारी त्रिंबक वाकचौरे, पी़ के़ वेळापुरे आदी उपस्थित होते. बोर्डाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

सीडीची विक्री मोठ्या प्रमाणावर

खेड्यापाड्यातून आलेल्या अनुयायांसाठी भोजनाची, तसेच त्यांच्या आरोग्याच्या तपासणीची काळजी विविध संस्था आणि संघटनांनी घेतली होती. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने मोफत आरोग्य सेवा, औषधे देण्यात आली. तसेच विविध सामाजिक संघटना व काही व्यक्तींनी पाणी व नाश्ता-भोजनाची व्यवस्था केल्याचे दिसून आले. विविध पुस्तक स्टॉलवर दिनदर्शिका, झेंडे, तसेच खेळणी व वस्तू खरेदीसाठी प्रचंड गर्दी दिसून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध यांच्या आकर्षक प्रतिमा, तसेच सीडींची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती येथील विक्रेत्यांनी दिली.

चोख पोलीस बंदोबस्त

मंगळवारी सकाळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त जी. एस. माडगूळकर यांनी बंदोबस्ताची पाहणी केली. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी
सहायक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक, १३५ पोलीस कर्मचारी, ३५ महिला पोलीस, राज्य राखीव दलाची कंपनी (८२ जवान), विशेष शाखेचे दोन अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title:  Historical Buddha Vihar Anniversary: Range for Greetings in Dehurod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.