तळेगावचा इतिहास होणार ग्रंथबद्ध

By admin | Published: March 29, 2017 01:59 AM2017-03-29T01:59:43+5:302017-03-29T01:59:43+5:30

तळेगाव दाभाडे इतिहास ग्रंथनिर्मिती समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्रंथनिर्मिती शुभारंभ करण्यात आला

The history of Talegaon will be scripted | तळेगावचा इतिहास होणार ग्रंथबद्ध

तळेगावचा इतिहास होणार ग्रंथबद्ध

Next

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे इतिहास ग्रंथनिर्मिती समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्रंथनिर्मिती शुभारंभ करण्यात आला.
तळेगावच्या दाभाडे राजघराण्यातील माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, उमाराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे, ग्रंथनिर्मिती समितीचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, समितीचे उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, मुख्य संपादक सुरेश साखवळकर, कार्यकारी संपादक प्रा. जयंत जोर्वेकर, सचिव वसंतराव भेगडे आदी उपस्थित होते.
या वेळी ‘तळेगावचा इतिहास’ या विषयावर इतिहासाचे अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान झाले. सुरेश साखवळकर प्रास्ताविकात म्हणाले की, समग्र तळेगावचा इतिहास हा संकल्प कृष्णराव भेगडे यांच्या मनात येणे हा दैवी संकेत म्हणावा लागेल. तळेगावचा इतिहास रोमहर्षक व प्रेरणादायी आहे. त्यामुळे या ग्रंथासाठी १० विषय समित्या नेमल्या असून, तळेगावचे सर्व क्षेत्रांतील माहात्म्य या ग्रंथाच्या माध्यमातून जगापुढे येईल.
तळेगावचा मनोरंजक, रोमहर्षक इतिहास जगापुढे ठेवण्यासाठी हा ग्रंथनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. दाभाडे घराण्याचा कार्यकाल, स्वातंत्र्यपूर्व कालखंड व नंतरचा कालखंड याचा आढावा आम्ही घेत आहोत. तळेगाव काल, आज, उद्या असे ग्रंथाचे स्वरूप राहील. गावातील विविध क्षेत्रांतील संस्था, व्यक्तींचे योगदान याचा आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. नव्या पिढीचे जीवन घडविण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. पहिले तीन महिने माहिती संकलन करून एक वर्षात ग्रंथ प्रकाशन केले जाणार आहे. सर्वांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारणार आहे. प्रत्येक घरात हा ग्रंथ संग्रही राहिला पाहिजे. नव्या विकसित तळेगावच्या दृष्टीने व्हीजन या ग्रंथाच्या निमित्ताने शब्दबद्ध होणार आहे.
पुढच्या पाडव्यापर्यंत ग्रंथ प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रात प्रमाणभूत ग्रंथ ठरेल. इतर शहरे या ग्रंथापासून प्रेरणा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खंडेराव दाभाडे यांना सरसेनापतिपद मिळून ३०० वर्षे पूर्ण झाली. त्याच वर्षी ही ग्रंथनिर्मिती होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. सर्वांनी या ग्रंथनिर्मितीत योगदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जोर्वेकर यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: The history of Talegaon will be scripted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.