हायटेक पालिकेत कामकाज पारंपरिक, लॅपटॉपचा होत नाही वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:28 AM2017-11-17T06:28:10+5:302017-11-17T06:28:24+5:30
मोबाइल अॅपच्या माध्यमातून नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवाव्यात. सर्व कार्यालये ई-गव्हर्नन्सने जोडली असल्याने नळजोड, मिळकतकरभरणा, घरदुरुस्ती अर्ज आदी कामे घरबसल्या करणे शक्य असल्याचा दावा महापालिका प्रशासन करते. मात्र...
पिंपरी : मोबाइल अॅपच्या माध्यमातून नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवाव्यात. सर्व कार्यालये ई-गव्हर्नन्सने जोडली असल्याने नळजोड, मिळकतकरभरणा, घरदुरुस्ती अर्ज आदी कामे घरबसल्या करणे शक्य असल्याचा दावा महापालिका प्रशासन करते. मात्र, हायटेक महापालिकेत कामे मात्र जुन्याच पद्धतीने होत असल्याने कामकाज ढिम्मच असल्याचा अनुभव नागरिकांना पदोपदी येत आहे.
महापालिकेच्या विविध विभागांचा एकमेकांशी योग्य प्रकारे समन्वय नाही. अधिकाºयांकडील लॅपटॉपवर नेमके काम काय केले जाते, याचा आढावा महापालिका आयुक्तांनी घेतल्याने अनेक बाबी पुढे येतील. कार्यालयात टेबलावर उच्च दर्जाचे संगणक आहेत. घरी तातडीच्या वेळी काम करता यावे, याकरिता महापालिकेने लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत. असे असताना, वेळेचे महत्त्व न जाणणारे आणि संथगतीने काम करण्याची सवय जडलेले अधिकारी, कर्मचारी पूर्वीप्रमाणे मर्जीनुसार कामकाज करताना दिसून येतात.
महापालिकेत सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा असताना, साध्या कागदावर हस्तलिखित तयार करून माहिती प्रसारित करण्याचे काम केले जाते. साध्या कागदावर लिहिलेले निवेदन व्हॉट्स अॅपवर पाठवून आपली जबाबदारी संपली, अशा पद्धतीने काम करण्याची प्रथा अद्यापही रुजलेली आहे. क्रीडा क्षेत्रात महापालिकेचे चांगले काम आहे. भरीव कामगिरी केल्याचे सांगितले जात असताना, महापालिकेचे क्रीडा अधिकारी मात्र अद्यापही खेळांच्या स्पर्धांचे निकाल त्यांच्या सोईने अन् पारंपरिक पध्दतीने देतात.
लॅपटॉपचा होत नाही उपयोग-
जनसंपर्क विभागामार्फत वेळच्या वेळी माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचत नाही. विविध विभागांशी समन्वय नसल्याने त्या विभागांच्या प्रमुखांमार्फत त्यांना जसे जमेल, त्या पद्धतीने माहिती प्रसारित केली जाते. बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग अपवाद वगळता अन्य विभागांतील अधिकारी संगणकाचा वापर करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे कामकाज करतात. अधिकाºयांना महापालिकेने दिलेले संगणक त्यांच्या मुलांना गेम खेळण्यासाठी वापरात येऊ लागले आहेत. अनेक अधिकाºयांना अजूनही
इंटरनेटचा योग्य प्रकारे वापर करता येत नाही.