मोशी परिसरातील होर्डिंग कोसळून अपघात; महापालिकेची हातोडा मोहीम सुरु
By विश्वास मोरे | Published: May 20, 2024 02:39 PM2024-05-20T14:39:18+5:302024-05-20T14:39:44+5:30
महापालिका आयुक्तांनी प्रशासनाची बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे
पिंपरी : मोशी येथे मागील आठवड्यामध्ये होर्डिंग कोसळून अपघात झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत होर्डिंग पाडण्याची मोहीम महापालिकेने आजपासून सुरू केली आहे. मोशी परिसरातील होर्डिंग पाडण्यात येत आहेत.
एक वर्षांपूर्वी किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबाबत लोकमतने वृत्त मालिकाही प्रसिद्ध केली होती. याची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाची बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर परिसरातील २४ होर्डिंग ला नोटीस देण्यात आले होत्या.
त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळपासून शहर परिसरातील विविध भागांमध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नगर, मोशी परिसरातील होर्डिंग काढण्यास सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात केली आहे. कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. तसेच जेसीपी क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग पाडले जात आहेत.