पिंपरी चिंचवडमध्ये गृहखरेदीचा उच्चांक, पाच हजार घरांचे बुकिंग, ग्राहकांनी दसऱ्याचा मूहर्त साधला
By प्रकाश गायकर | Published: October 25, 2023 05:39 PM2023-10-25T17:39:37+5:302023-10-25T17:40:05+5:30
नागरिकांकडून ५० लाख ते १ कोटीपर्यंतच्या घरांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
पिंपरी : नवरात्रीचे नऊ दिवस व दसऱ्याच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वप्ननातील घर घेण्याचे स्वप्न अनेक नागरिकांनी पूर्ण केले आहे. या दहा दिवसांमध्ये ५ हजार नागरिकांनी वन, टू, थ्री बीएचके घर बुक केले आहे. नागरिकांकडून ५० लाख ते १ कोटीपर्यंतच्या घरांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरात प्रचंड वेगाने गृहप्रकल्पांची कामे सुरू असून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शहरामध्ये मोठे टॉवर्स उभे राहत असून बहुमजली गृहसंकुलांचेही प्रमाण वाढले आहे. वाकड, थेरगाव, पुनावळे, चऱ्होली, डूडूळगाव, मोशी या भागात असलेल्या चांगल्या सुविधा व कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांकडून या भागात घर खरेदीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा नवरात्र व दसऱ्याच्या मूहर्तावर बांधकाम व्यावसायिकांकडून अनेक आकर्षक ऑफर्सची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये शून्य स्टॅम्प ड्युटी तसेच बुकिंगवर इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्कूटर, सोने-चांदीचे नाणे यांचा समावेश होता. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पांमध्ये दहा दिवसांमध्ये ५ हजार घरांचे बुकिंग करण्यात आले आहे. तर गेल्या महिन्यामध्ये बुकिंग केलेल्या बहुतांश जणांनी नोंदणी केली. नोंदणी व दहा दिवसांतील बुकिंगने सुमारे २५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेकडून सांगण्यात आले.
विविध आकर्षक ॲमिनिटीज
मल्टिपल स्विमिंग पूल, किड्स प्ले एरिया, जिम्नॅशियम, मिनी थिएटर, गार्डन क्लब हाऊस, पोडियम पार्किंग, लार्ज ओपन स्पेस, टेरेस पोडियम ॲमिनिटीचेही आकर्षण गृहखरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी गृहखरेदीमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हणून नागरिकांची पिंपरी चिंचवडला पसंती
आपलेही छानसे टुमदार घर असावे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न असते. कुटुंबाच्या अपेक्षा, गरजा आणि बजेट या सर्व गोष्टींच्या आधारावर घरासाठी प्रयत्न सुरू असतात. अतिशय सुंदर, वेगाने विस्तारित व विकसित होणाऱ्या तसेच औद्योगिक कंपन्या व आयटी पार्क असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात घर घेण्यासाठी नागरिकांची पसंती मिळत आहे.
ग्राहकांचा यंदा घर घेण्याकडे जास्त ओढा आहे. पितृ पंधरवाड्यात देखील नागरिकांनी घरे बुक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोयी-सुविधांयुक्त घरे आहेत. टू बीएचके घर घेण्यास नागरिकांची पसंती आहे. - आकाश फरांदे, बांधकाम व्यावसायिक.