"पोलिस आम्हाला काहीही करू शकत नाहीत..." बंदूकधारी बाॅडीगार्डसह घरात घुसून विनयभंग
By नारायण बडगुजर | Updated: August 18, 2022 14:36 IST2022-08-18T14:33:32+5:302022-08-18T14:36:29+5:30
पुणे जिल्ह्यातील घटना...

"पोलिस आम्हाला काहीही करू शकत नाहीत..." बंदूकधारी बाॅडीगार्डसह घरात घुसून विनयभंग
पिंपरी : बंदूकधारी बाॅडीगार्डसह घरात घुसून महिलेच्या पतीला मारहाण केली. तसेच महिलेच्या आणि तिच्या सुनांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. पोलीस आमचे काहीएक करू शकत नाही, असे म्हणून घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. मुळशी तालुक्यातील माण येथे मंगळवारी (दि. १६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. १७) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि हे नातेवाईक आहेत. यापूर्वी दोघांचे एकमेकांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अर्ज दिले आहेत.
फिर्यादी महिला मंगळवारी सायंकाळी घरी असताना आरोपी हे बंदुकधारी बाॅडीगार्डसह फिर्यादी महिलेच्या घरात घुसले. फिर्यादी महिलेच्या पतीला शिवीगाळ करून ढकलले. आमच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार देतो काय, पोलीस आमचे काहीएक करू शकत नाही, असे म्हणून हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी त्यांच्या पतीला सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच गैरवर्तन केले. फिर्यादी महिलेच्या सुनेलाही कानाखाली मारून तिलाही शिवीगाळ केली.
त्यानंतर फिर्यादी महिलेच्या घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या दोन्ही सुनांच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ तपास करीत आहेत.