पाडव्याच्या मुहूर्तावर घर, वाहनांचे बुकिंग
By admin | Published: March 28, 2017 02:43 AM2017-03-28T02:43:49+5:302017-03-28T02:43:49+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानलेल्या गुढीपाडवा उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकांनी नवीन
पिंपरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानलेल्या गुढीपाडवा उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अनेकांनी नवीन घरांचे, तसेच मोटारींचे बुकिंग केले आहे. सण, उत्सवाच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. मराठी नववर्षारंभ असल्याने या मुहूर्तावर व्यवसाय-उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यास अनेकजण प्राधान्य देत आहेत. एकूणच व्यवसाय, उद्योगांचा शुभारंभ आणि नूतन वास्तू, मोटार, दागिनेखरेदी यामुळे नोटाबंदीनंतरच्या काळातही मोठ्या उलाढालीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.
गुढीपाडवा या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाच्या तोंडावर अनेकांनी हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यांच्याकडे स्वत:चे घर आहे, परंतु चारचाकी मोटार घ्यायची आहे, त्यांनी पाडव्याला सणाच्या दिवशी घरी मोटार येईल, या दृष्टीने तयारी केली आहे. कोणी दागिने खरेदीला प्राधान्य दिले आहे. कोणी घराचे स्वप्न साकार करण्याला महत्त्व दिले आहे. काहींनी व्यवसाय सुरू करण्यास हीच वेळ योग्य आहे, असे मानून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. अगदी चहा-नाष्ट्याची टपरी ते मॉलच्या धर्तीवर सुरू केली जाणारी मोठी व्यावसायिक दालने यांच्या उद्घाटनासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्ताची अनेकांना प्रतीक्षा आहे. दुकान, शैक्षणिक संकुल, अकादमी, कार्यालय यांचा केवळ उद्घाटन समारंभ बाकी आहे. (प्रतिनिधी)