सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:10 PM2019-12-20T16:10:29+5:302019-12-20T16:11:00+5:30
आरोपीवर देहुरोड, चिंचवड, भोसरी, दौंड या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल
पिंपरी : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अठक करण्यात आली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी (दि. १८) ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उर्फ रुपेश सुरेश पाटील (वय २८, रा. भोसरी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. संतोष पाटील याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी येथील स्मशानभूमीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावरून पायी चालत येऊन स्मशानभूमीच्या प्रवेशव्दारासमोर येऊन थांबला. त्यावेळी त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्याजवळ जात असताना त्याला संशय आला. त्यामुळे तेथून तळ्याच्या दिशेने मोकळ्या मैदानाकडे पळून जाऊ लागला. त्यावेळी पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाटील याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी संतोष पाटील याच्यावर देहुरोड, चिंचवड, भोसरी, दौंड या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, बेकायदा पिस्तूल बाळगणे असे सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे तसेच पोलीस कर्मचारी विजय मोरे, प्रवीण पाटील, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
खूनप्रकरणी आरोपी दोन वर्षे होता जेलमध्ये
आरोपी संतोष पाटील हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. २०१४ मध्ये रावेत येथील हॉटेल शिवनेरीसमोर विनायक शिंदे (रा. रावेत) यांचा गोळ्या घालून खून झाला होता. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी संतोष पाटील व त्याचे साथीदार प्रदीप पवार, कौशल विश्वकर्मा, तुषार जोगदंड, प्रदीप गाढवे, राहुल करंजकर यांनी हा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. याप्रकरणी आरोपी संतोष पाटील सुमारे दोन वर्षे जेलमध्ये होता.