प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली
By नारायण बडगुजर | Updated: April 14, 2025 18:11 IST2025-04-14T18:10:40+5:302025-04-14T18:11:12+5:30
चिखली पोलिसांनी २० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाला शोधले, तेव्हा त्याने संबंधित बॅग सुरक्षित ठेवल्याचे सांगितले

प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली
पिंपरी : प्रवासी महिला रिक्षातून प्रवास करताना पावणे सात लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्ये विसरली. मात्र प्रामाणिक रिक्षा चालकाने ती बॅग पोलिसांमार्फत संबंधित प्रवासी महिलेला परत केली. ही घटना नेवाळेवस्ती चिखली येथे ११ एप्रिल रोजी घडली.
नेवाळेवस्ती येथील प्रतिभा काळे यांनी ११ एप्रिल रोजी नेवाळेवस्ती येथून चिखली गाव येथे रिक्षाने प्रवास केला. चिखली गाव येथे उतरल्यानंतर रिक्षामध्ये त्यांची सोने असलेली पर्स विसरली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ चिखली पोलिसांकडे धाव घेतली. प्रतिभा काळे यांना संबंधित रिक्षाचा क्रमांक माहिती नसल्याने रिक्षा चालकाचा शोध घेणे पोलिसांसमोरील आव्हान होते. पोलिसांनी नेवाळे वस्ती येथील रिक्षा स्टॉप वरून चिखली गाव दरम्यानच्या मार्गावरील २० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. त्यामधून प्रतिभा काळे यांनी प्रवास केलेल्या रिक्षाचा नंबर पोलिसांनी मिळवला. त्यानंतर संबंधित रिक्षा चालक बाळू जाधव (रा. चिखली) यांची पोलिसांनी भेट घेतली. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी संबंधित बॅग सुरक्षित ठेवली असल्याचे सांगितले. तसेच दागिने असलेली बॅग रिक्षाचालक बाळू जाधव यांनी पोलिसांना परत केली. पोलिसांनी प्रामाणिक रिक्षाचालक बाळू जाधव यांचा सत्कार केला.
परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. शवाजी पवार, सहायक आयुक्त अनिल कोळी, चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राम गोमारे, पोलिस अंमलदार विनोद व्होनमाने, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संतोष भोर, नारायण सोमवंशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.