बोपखेलकरांना प्रतीक्षा रस्त्याची
By admin | Published: May 22, 2017 05:03 AM2017-05-22T05:03:00+5:302017-05-22T05:03:00+5:30
संरक्षण खात्याच्या हद्दीत असलेल्या बोपखेल गावचा रस्ता संरक्षण खात्याने कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) व्यवस्थापनाने बंद केला
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : संरक्षण खात्याच्या हद्दीत असलेल्या बोपखेल गावचा रस्ता संरक्षण खात्याने कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) व्यवस्थापनाने बंद केला. हा रस्ता खुला व्हावा, या मागणीसाठी २१ मे २०१५ ला बोपखेल ग्रामस्थांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात ४० लोक आणि १५ पोलीस जखमी झाले. दगडफेक झाली, त्यात जखमी होऊन एका पोलिसाचा मृत्यू झाला. या हिंसक आंदोलनाच्या जखमा अद्यापही भळभळताहेत.
दापोडी ते बोपखेल असा सीएमईमधून जाणारा ३ किलोमीटरचा रस्ता १८ किलोमीटरचा झाला होता. दैनंदिन वापरासाठी दूर अंतर वळसा घालून जाण्यापेक्षा काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी झाली. उपाय म्हणून मुळा नदीवर खडकीच्या बाजूने तरगंता पूल एक महिन्याने सुरू करण्यात आला. मात्र, सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ६ जून २०१६ ला तो पूलही काढून टाकण्यात आला. तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रीकर, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, संरक्षण खात्याचे इतर अधिकारी नागरिक यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या.
मात्र, यावर अद्याप ठोस पर्याय शोधलेला नाही. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी तीन रस्त्यांचे पर्याय ठेवले होते. त्यामध्ये सध्या बंद केलेल्या रस्त्याच्या बाजूने उंच सीमाभिंत बांधणे, सीएमईच्या आणि मुळा नदीच्या कडेने नवीन रस्ता तयार करणे आणि खडकीच्या बाजूने अॅम्युनेशन फॅक्टरीकडे निघण्यासाठी नदीवर पूल उभारून खडकीतील गवळीवाडा येथे मुख्य रस्त्याला जोड देणे असे पर्याय पुढे आले.