मृताच्या वडिलांकडून रहाटणीतील मेट्रो हॉस्पिटलची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:30 PM2018-01-01T15:30:54+5:302018-01-01T15:35:06+5:30
मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे.
रहाटणी : सुमारे तीन महिन्यापूर्वी स्वाईन फ्लूने आजारी असलेल्या महिलेचा मृत्यू येथील नखाते चौकातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये झाला होता. त्या मृत्यूस हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार असल्याचा राग मनात धरून रविवारी सकाळी मृत महिलेच्या वडिलांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून दामोदर गाडेकर (वय ६५, रा. बळीराजा मंगल कार्यालया समोर, रहाटणी) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर यांची मुलगी तीन महिन्यात पूर्वी स्वाईन फ्लूने आजारी होती. तिला मेट्रो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र ती उपचारादरम्यान दगावली, हा मृत्यू रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा तिच्या वडिलांचा आरोप होता. मुलगी दगावल्याने त्याचा काहीतरी मोबदला रुग्णालय प्रशासनाने द्यावा, अशी मागणी तिच्या वडिलांनी होती. त्यास रुग्णालय प्रशासन तयार झाले होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्या व्यक्तीस फक्त आश्वासानच दिले जात होते व टाळाटाळ केली जात होती हे त्याच्या लक्षात आल्याने रविवारी सकाळी सुमारे नऊ च्या सुमारास मृत मुलीचा फोटो रुग्णालयासमोर ठेवून त्यास पुष्पहार घालून त्यांनी लोखंडी घणाच्या साह्याने रुग्णालयाची फारशी, काचा व इतर सामानाची तोडफोड केली तसेच रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचीही तोडफोड करण्यात आली त्यात सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.