देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, वसतिगृह प्रशासनाचा मदत घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:16 AM2018-05-11T03:16:01+5:302018-05-11T03:16:01+5:30
वडगाव मावळ येथील न्यायालयाच्या लगत असणाºया शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत.
वडगाव मावळ - येथील न्यायालयाच्या लगत असणाºया शासकीय आदिवासी वसतिगृहाची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या गावी जाण्याची तयारी करू लागले आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच वडगावमधील नागरिक आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरसावले. परंतु आदिवासी वसतिगृहाच्या प्रशासनाने शासकीय नियमांच्या अडथळ्यांमुळे मदत घेण्यास नकार दिल्याने आदिवासी विद्यार्थी पुन्हा अन्न, पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या गीताप्रमाणे ‘देणाºयाचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वडगाव मावळ येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात गेल्या १५ दिवसांपासून उपाहारगृह बंद असल्याने विद्यार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. वसतिगृहातील
काही विद्यार्थी परीक्षा झाल्याने
गावी गेले आहेत़ तर वसतिगृहातील १६ विद्यार्थी इतर ठिकाणी शिक्षण
घेत असल्याने वसतिगृहातच
राहात आहेत. फक्त १६
विद्यार्थी असल्याने उपाहारगृह चालवणे परवडत नाही, असे कारण सांगून उपाहारगृह बंद करण्यात आले आहे.
वडगावात हे वसतिगृह येत असल्याने ‘लोकमत’च्या माध्यमातून वडगावमधील नागरिकांना ही माहिती मिळताच गेल्या तीन ते चार दिवसांत विद्यार्थांना अनेक नागरिकांनी लोकमतकडे मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु वसतिगृह प्रशासन नागरिकांची मदत घेण्यास तयार नसल्याने विद्यार्थी उपाशी राहात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वसतिगृहाची झालेली दुरवस्था पाहून अनेक नागरिकांनी मदतीसाठी विचारणा केली; परंतु वसतिगृहाची इमारत भाडेतत्त्वावर असल्याने यात काही बदल करता येणार नाही, असे वसतिगृह प्रशासनाकडून कळवण्यात येत आहे. वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मुलांना पाणी पिण्यासाठी रेल्वे स्थानक किंवा जवळच असणाºया पोलीस स्टेशनमधून पाणी घेऊन यावे लागते ही माहिती लोकमतकडून उद्योजक श्रीकांत वायकर यांना समजताच त्यांनी विद्यार्थांना कायमस्वरूपी रोज पाणी फिल्टर असलेल्या थंड पाण्याच्या ६० लिटरच्या ५ मोठ्या बाटल्या देण्याचे ठरवले. त्यानुसार बाटल्या वसतिगृहात पाठवण्यात आल्या. परंतु वसतिगृहाने पाणी घेण्यास नकार दिला.
त्याचप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष राजेश बाफना व राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष अतुल वायकर यांनी प्रत्येकी
दोन महिने किराणा देण्याचे वसतिगृह प्रशासनाला बोलून दाखवले़
परंतु ते ही घेण्यास त्यांनी नकार दिल्याने मुलांना जेवणासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आदिवासी विद्यार्थांना जेवण आणि पाण्यासाठी वसतिगृह सोडून जाण्याची वेळ आली आहे.
मावळ, पालघर, जळगाव, नंदुरबार, नगर या भागातील विद्यार्थी वसतिगृहात राहतात. वसतिगृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, भर उन्हाळ्यात वसतिगृहाच्या छतावरून पाण्याच्या टाकीचे पाणी गळत आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात. त्यामुळे एकतर आदिवासी वसतिगृहातील प्रशासनाने मुलाच्या जेवणाची व्यवस्था करावी किंवा नागरिकांकडून मदत घ्यावी, अशी मागणी वडगावमधील नागरिक करत आहेत.
कारवाईची मागणी : अधिकाºयांना पाहणी करावी
येथील १६ विद्यार्थ्यांना दिवसाला प्रत्येकी १०० रुपये देण्याचे ठरवले आहे या १०० रुपयात विद्यार्थ्याना २ वेळेचे जेवण व २ वेळेचा नाष्टा करायचा आहे. परंतु सद्य महागाईच्या काळात १०० रुपयात विद्यार्थ्यांचे भागात नसल्याने त्यांनी एक वेळ उपाशी राहून अभ्यास करावा लागत आहे . किंवा हे विद्यार्थी वसतिगृहात जेवण मिळत नसल्याने वडगाव मधील असणाºया मंगलकार्यालयात लग्न समारंभाच्या ठिकाणी जेवण करून दिवस काढत आहेत. वडगाव मावळमधील पंचायत समिती कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसतिगृहात विद्यार्थ्यांची अशी दुरवस्था होत असल्याने ह्या वसतिगृहाची तहसीलदार रणजित देसाई व पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी एकत्रित पहाणी करून दोषी वसतिगृह प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी वडगावमधील नागरिक करत आहेत़
वसतिगृहाला अन्नपुरवठा करण्यासाठी शासनाने यापूर्वीच निविदा काढली आहे. त्याचे पैसेही संबंधित ठेकेदाराला देण्यात आले असल्याने आपल्याला नागरिकांची मदत घेता येत नाही. संबंधित ठेकेदाराला उपाहारगृह चालू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दोन दिवसांत विद्यार्थ्यांना वेळेवर पुन्हा जेवण मिळेल. - नितीन भगत (वसतिगृह, गृहपाल)